Last Updated: Tuesday, November 13, 2012, 16:13
www.24taas.com, मुंबई दिवाळीच्या आधीच दिवाळं निघालेली किंगफिशर एअरलाईन्सचे जवळजवळ ३००० कर्मचा-यांना यंदा मात्र अंधारातच दिवाळीत साजरी करावी लागतेय. कर्मचा-यांनी कामावर रुजू व्हावं, यासाठी किंगफिशरनं मे महिन्याचं वेतन दिवाळीत देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण कंपनीला मात्र आपलं आश्वासन पाळता आलेलं नाही.
कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३००० कर्मचा-यांना दिवाळी गिफ्ट म्हणून विजय माल्ल्याकडून ठेंगा मिळालय. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कर्मचा-यांसाठी ही दिवाळी काळी दिवाळी ठरलीय. कर्मचा-यांना थकीत पगार द्यायचं दिलेलं वचन कंपनीनं लाथाडलंय. १२ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत हे सर्व कर्मचारी आपला पगार आपल्या खात्यात जमा होईल, अशा आशेवर होते. पण त्यांची आशा मात्र फोल ठरलीय.
किंगफिशर एअरलाईन्स तोट्यात आल्यानंतर कर्मचारी एक ऑक्टोबर रोजी संपावर गेले होते. या कर्मचा-यांनी परत कामावर रुजू व्हावं, यासाठी कंपनीचे सीईओ संजन अग्रवाल यांनी या कर्मचा-यांना मे महिन्याचा थकीत पगार दिवाळीच्या आधी देण्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर कर्मचा-यांनी आपला संप मागे घेतला होता. पण, आता मात्र त्यांच्यावर अंधारात दिवाळी साजरी करण्याची वेळ आलीय.
First Published: Tuesday, November 13, 2012, 16:12