Last Updated: Wednesday, June 18, 2014, 14:20
www.24taas.com, वृत्तसंस्था, लखनौ उत्तरप्रदेशातल्या बुजुर्ग गावच्या रेल्वे ट्रॅकवर अचानक पैशांचा पाऊस सुरू झाल्यानं अनेकांना सुखद धक्का बसला. गावकरी तब्बल दीड किलोमीटरपर्यंत पैसे गोळा करताना थकून गेले होते.
त्याचं झालं असं की, मंगळवारी दरियापूर येथील बुजुर्ग गावच्या रेल्वे ट्रॅकवरून दिल्ली - काठगोदाम शताब्दी एक्सप्रेस जात होती... आणि अचानक एका डब्यातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा ट्रेनमधून बाहेर उडायला सुरुवात झाली. जवळच्याच शेतात काम करत असलेल्या गावकऱ्यांची नजर या उडत्या नोटांवर गेली आणि त्यांनी ही संधी साधून पैसे गोळा करायला सुरुवात केली.
ट्रॅकवर पडलेल्या अनेक नोटा गावातल्या लोकांनी आपल्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे, ही संधी साधणारे गावकरी आता लखपती झाले आहेत. रेल्वेमागून धावत धावत तब्बल दीड किलोमीटरपर्यंत या गावकऱ्यांनी पैसे गोळा केलेत. दरियापूर बुजुर्ग गावापासून महेशरा गावापर्यंत दीड किलोमीटरपर्यंत नोटा उडत होत्या. त्या गावातल्या लोकांना तर एक ते दीड लाखाची लॉटरीच लागली आहे.
500 आणि 100 च्या नोटांसोबत 100च्या ही काही नोटा सापडल्यात. रेल्वे कर्मचारी दिलीप सैनी यांनी ही घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले... पण, या नोटा रेल्वेतून कुणी आणि का फेकल्या याबाबतीत मात्र अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 18, 2014, 14:20