मोदींची रथयात्रा सुरू; एनडीएचा वाढता विरोध, modi rathyatra, nda against modi

मोदींची रथयात्रा सुरू; एनडीएचा वाढता विरोध

मोदींची रथयात्रा सुरू; एनडीएचा वाढता विरोध
www.24taas.com, अहमदाबाद
दोन महिन्यांनी होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यभरातल्या यात्रेला आजपासून सुरूवात केली. महिन्याभराच्या या यात्रेच्या माध्यमातून मोदी अधिकाधिक युवक आपल्यासोबत जोडले जातील, या प्रयत्नात आहेत. यंदा प्रथमच गुजरातमधले ६० टक्के मतदार युवक असल्यानं मोदींसाठी ही यात्रा महत्त्वाची ठरणार आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आता एनडीएमधूनच तीव्र विरोध होऊ लागलाय. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापाठोपाठ आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मोदींविरोधात मोर्चा उघडणार असल्याचं स्पष्ट केलंय. मोदींच्या गुजरातमध्ये होणारी आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. तर दुसरीकडे जेडीयूनेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाहीतर गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी नितीशकुमारांसह आपण स्वतःही मैदानात उतरणार असल्याचं शरद यादव यांनी ठणकावलंय. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना पसंती देत मोदींना विरोध असल्याचेच स्पष्ट संकेत दिलेत. एकूणच एनडीएमधूनच मोदींविरोधात असा वाढता सूर उमटू लागल्याने आगामी निवडणूक मोदींसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचं बोललं जाऊ लागलंय.

First Published: Tuesday, September 11, 2012, 15:26


comments powered by Disqus