Last Updated: Friday, January 25, 2013, 16:33
www.24taas.com, नवी दिल्ली माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारताच्या अण्वस्त्र चाचण्यांसदर्भात खळबळजनक दावा केलाय.
भारतानं १९९६ मध्ये अण्वस्त्र चाचण्यांची तयारी केली होती. मात्र, प्रत्यक्षात चाचण्या दोन वर्षांनंतर म्हणजे १९९८ मध्ये घेण्यात आल्या. १९९८ च्या अणुचाचण्या करतानाही जगाचं लक्ष दुसरीकडं वळवण्यासाठी क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या, असं कलाम यांनी म्हटलंय. ते सातव्या आर. एन. काव. मेमोरियल व्याख्यानमालेतील आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी कलाम हे तत्कालीन संरक्षणमंत्र्यांचे सल्लागार म्हणून काम पाहत होते.
‘१९९६ मधील ते दृश्यं व क्षण आजही मला आठवतो... ज्यावेळी मला एक फोन आला होता व तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी मला तत्काळ बोलवून घेतले होते. मी तात्काळ राव यांच्याकडे पोहचलो. त्यावेळी राव यांनी सांगितले की, कलाम आणि त्यांच्या टीमने दोन दिवसात अणुचाचणी करण्यासाठी तयार राहावे. मी आता तिरूपतीला जात आहे. आपली टीम चाचणीसाठी तयार असायला पाहिजे. मात्र, दोन दिवसांनी जेव्हा लोकसभेचा निकाल आला आणि परिस्थिती बदलत गेली. राव यांचे सरकार सत्तेवर आले नाही व सत्तेची सूत्रे अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे गेली. त्यानंतर राव यांचा मला फोन आला व त्यांनी मला परिस्थिती सांगितली. तसेच पुढील अणुचाचणीबाबत वाजपेयी यांना माहिती देण्यास सांगितले’ असं यावेळी बोलताना डॉ. कलाम यांनी म्हटलंय.
First Published: Friday, January 25, 2013, 16:24