असं आहे नरेंद्र मोदींचं वैयक्तिक आयुष्य..., narendra modi in personal life

मोदींचे वडीलबंधू म्हणतात, त्यांना आमची गरज नाही...

मोदींचे वडीलबंधू म्हणतात, त्यांना आमची गरज नाही...
www.24taas.com, अहमदाबाद

नरेंद्र मोदी... गुजरातचे मुख्यमंत्री... आत्तापर्यंत सामाजिक जीवनात अनेक प्रसंगात अनेक रुपांत लोकांसमोर आलेले नरेंद्र मोदी सर्वांनीच पाहिलेत. पण, याच नरेंद्र मोदींचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, हे सांगताना त्यांचे मोठे भाऊ सोमाभाई मोदी सांगतात, की नरेंद्रला ‘वैयक्तिक आयुष्य नाहीच... एव्हढंच नव्हे तर वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजेच १९६७ साली घर सोडल्यानंतर पुन्हा कधीही नरेंद्र कधी घरी परतलाच नाही’.

सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले ६७ वर्षीय सोमाभाई यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना आपल्या भावाबद्दल काही इतरांना माहीत नसलेल्या अशा गोष्टी समोर मांडल्यात. ‘आज सगळे जग मोदींकडे पाहते आणि म्हणते की ते एक नेता, मुख्यमंत्री कसे बनले. पण त्यासाठी वैयक्तिक जीवनाचा त्याग करुन समाजासाठी वाहून घेतले. गेली ४५ वर्षे ते घरी आले नाहीत व त्यांनी कधी कुटुंबियांची विचारपूस केली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावर संस्कार व प्रभाव असल्यानेच त्यांनी विवाह केला नसावा. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर राखतो’ असं सोमाभाई यांनी म्हटलंय.

गुजरात निवडणुका तोंडावर आल्या असताना सोमाभाईंची मोदींना मदत होते का? असा प्रश्न आल्यावर सोमाभाईंनी सरळसरळ नाही म्हणून सांगितलंय. ते म्हणतात, ‘त्यांना आमची गरज नाही… आम्हीही त्यांच्या कामात लक्ष देत नाही… नाही आमच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत. माझ्या मुलाच्या लग्नालाही नरेंद्र आला नव्हता. मला जर त्याला भेटायचं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमांतच आमची भेट होते. तो मुख्यमंत्री नसता तरी तो घरी आला नसता...’

पण, नरेंद्र मोदींबद्दल मोठा अभिमानही सोमाभाईंना वाटतो. गुजरातच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातल्या एकाही मुख्यमंत्र्याची तुलना नरेंद्र मोदींशी होणं शक्य नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

First Published: Wednesday, December 5, 2012, 17:06


comments powered by Disqus