Last Updated: Tuesday, December 24, 2013, 16:47
www.24taas.com, झी मीडिया, पाटणाभाजप नेते गिरिराज सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची हत्या होईल, असं वक्तव्य करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिलीय.
नितीश कुमारांवर हल्लाबोल करताना गिरिराज सिंहांचा स्वत:वरचा ताबा सुटलाय. नितीश कुमारांच्या पराभवासाठी ४० जागांवर विजय गरजेचा असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलंय. तर यावर भाजपची विचारधारा धोकादायक असल्याची टीका जेडीयूनं केलीय.
वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेची झोड उठल्यानंतर सिंग बॅकफूटवर गेले असून आपण राजकीय हत्येबद्दल बोलत होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
भाजपच्या ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या मेळाव्यात बोलताना गिरीराज सिंग यांनी नितीशकुमारांवर जोरदार टीका केली. नितीश कुमारांचा जीव बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांमध्ये अडकला आहे. त्यांचा खातमा करायचा असेल तर त्या ४० जागा भाजपने जिंकायला हव्यात, असे सांगून, नितीशकुमारांची हत्या नरेंद्र मोदी यांच्या हातूनच होईल, असे सिंग म्हणाले.
या वक्तव्यानंतर सिंह यांच्यावर सर्वबाजूने टीका होऊ लागताच त्यांनी लगेचच सावध पवित्रा घेतला. माझ्या भाषणाची पूर्ण सीडी मी पाहिलेली नाही. एखादा शब्द बोलताना राहून गेला असेल तर मी माझे वक्तव्य मागे घेतो. भाजपने ४० जागा जिंकल्या तर नितीशकुमारांची राजकीय हत्या होईल, असे मला म्हणायचे होते, अशी सारवासारव त्यांनी केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 24, 2013, 16:21