‘राजीनाम्यासाठी २०१४ची वाट पाहा’, No question of my resignation: PM on coal issue

राजीनाम्यासाठी २०१४ची वाट पाहा - पंतप्रधानांचं उत्तर

राजीनाम्यासाठी २०१४ची वाट पाहा - पंतप्रधानांचं उत्तर
www.24taas.com, नवी दिल्ली
नुकत्याच इराण दौऱ्यावरून परतलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना जोरदार उत्तर दिलंय. ‘पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यासाठी विरोधकांना २०१४ ची वाट पाहावी लागेल’ असं सांगत पंतप्रधानांनी विरोधकांना कडक शब्दात प्रत्युत्तर दिलंय. याचवेळी पंतप्रधानांनी राहुल गांधी मंत्रिमंडळात लवकरच दाखल होणार असल्याचंही सुतोवाच केलंय.

कोळसा खाण घोटाळ्यावरून संसदेत होणाऱ्या गोंधळावर आज पंतप्रधानांनी कडक धोरणाचा अवलंब केलाय. इराण दौऱ्यावरुन भारतात परतलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर घणाघाती टीका केलीय. भाजपच्या मागणीवरुन राजीनामा देणार नाही. माझ्या राजीनाम्यासाठी भाजपला 2014 च्या निवडणुकीची वाट पहावी लागेल असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

‘पंतप्रधान पदाच्या काही जबाबदाऱ्या असतात काही कर्तव्य असतात आणि ती मला पार पाडायचीत. मी विनाकारण निर्माण केल्या जाणाऱ्या पडणार नाही. यासंबंधी निर्माण होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांनाही मला उत्तर द्यायचं नाही. पण, भाजपकडून होणारे सारे आरोप अकारण आहेत. विरोधकांनी जास्त गोंधळ न करता सरकारच्या कामात अडथळा आणू नये’ असं पंतप्रधानांनी आज म्हटलंय.

राहुल गांधी कॅबिनेटच्या कामात सहभागी होणार का या प्रश्नावर उत्तर देताना ‘राहुल गांधींचा लवकरच मंत्रिमंडळात जबाबदारी स्वीकारतील अशी मला आशा आहे’ असं म्हणत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकप्रकारे राहुल गांधींच्या लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळातील सहभागावर शिक्कामोर्तबच केलंय. याच वेळी पंतप्रधान पदही लोकपालच्या कक्षेत यावं असं आपलंही म्हणणं असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय.

First Published: Friday, August 31, 2012, 17:30


comments powered by Disqus