Last Updated: Thursday, May 1, 2014, 16:22
www.24taas.com, झी मीडिया, बैतूल मध्यप्रदेशमधील बैतूलमध्ये दोन महिलांचे केस कापून यातील एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत संपूर्ण गावात फिरवलं गेलं. यामध्ये, या महिलेचा दोष एव्हढाच होता की तिनं दुसऱ्या समाजातील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता.
बैतूलमधल्या बीजादेही या गावात ही भयंकर घटना घडलीय. महिलेनं दुसऱ्या समाजातील तरुणाशी लग्न केल्यामुळे गावानं पंचायत बोलावली होती. यावेळी, संबंधित महिलेसह तिच्या मोठ्या बहिणीलाही गावातील चार महिलांनी फरफटत पंचायतीसमोर आणलं... इथं त्या दोघींना केस कापण्याची शिक्षा फर्मावण्यात आली.
एव्हढ्यावरच गावकऱ्यांचं समाधान झालं नाही... आपले कपडे फाडून अर्धनग्न अवस्थेत संपूर्ण गावात फिरवण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. दोघी बहिणींपैकी मोठ्या बहिणीवर अजूनही जिल्हा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दोघीही आदिवासी समाजातील महिला आहेत.
गावाच्या पंचायतीसमोर घडलेल्या या अमानवी कृत्यानंतर पोलिसांनी चार आरोपी महिलांविरुद्ध तक्रार नोंदवलीय. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बीजादेही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आलीय. पीडित महिलेच्या बहिणीची चौकशी सुरू आहे... आणि यामध्ये आणखी काही नावं आढळली तर त्यांच्याविरुद्धही तक्रार नोंदविली जाईल.
गावाच्या खाप पंचायतीनं सुनावलेल्या निर्णयानंतर आणि आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगानंतर दोन्ही महिलांसहीत त्यांचे कुटुंबीय दहशतीखाली वावरत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 1, 2014, 16:20