Last Updated: Tuesday, October 16, 2012, 16:31
www.24taas.com, गुलबर्गा, कर्नाटक कर्नाटकच्या गुलबर्गा स्टेशनवरच आज सोलापूर-गुलबर्गा पॅसेंजरच्या एका डब्याला भीषण आग लागली. या आगीत दोन जण जळून ठार झाले आहेत तर आणखी सात जण जखमी असल्याचं समजतंय. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
गुलबर्गा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक – ३ वर उभ्या असलेल्या सोलापूर-गुलबर्गा पॅसेंजरच्या सहाव्या डब्याला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं प्राथमिक वृत्त आहे. आज घटस्थापनेचा पहिलाच दिवस असल्यानं ट्रेनमध्येही गर्दी होती. आग लागलेल्या डब्यातही प्रवासी दाटीवाटीनं उभे होते. त्यामध्येच आग लागल्यानं प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला आणि काही मिनिटांमध्येच संपूर्ण डबा जळून खाक झाला.
गर्दी आणि गोंधळ्याच्या वातावरणात दोन जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांची ओळख मात्र पटू शकलेली नाही. ट्रेनमध्ये एकाच डब्याला नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास सुरु आहे.
First Published: Tuesday, October 16, 2012, 16:13