Last Updated: Wednesday, October 3, 2012, 20:30
www.24taas.com, नवी दिल्ली पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता आहे. प्रतिलिटर 1 रुपया 60 पैशांनी पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता असून, येत्या महिन्याभरात हा निर्णय होण्याची शक्यता आहे..
आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत वधारल्यानं, तेल कंपन्यांचा तोटा कमी झालाय. त्यामुळं पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीचा आधार घेत पेट्रोलच्या किंमती वाढवणा-या तेल कंपन्या सध्या चांगलाच नफा कमावत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घटलेल्या दरामुळे आणि रुपया मजबूत झाल्यामुळे तेल कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर प्रति लिटर दोन रुपयाहून अधिक फायदा होतोय. 15 सप्टेंबरपासून कच्च्या तेलाच्या किंमती जवळपास 4 डॉलर प्रति बॅरल कमी झाल्याएत. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे तेल कंपन्यांना क्रूड ऑईल आयात करणं स्वस्त झालंय.
भारतात आयात होणा-या ब्रैट क्रूड ऑईलची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास 4 डॉलरनं स्वस्त झालीए. एक महिनाआधी 3 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल 115 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास होतं. तर आता 111 डॉलर प्रति बॅरलपर्यंत विकलं जातंय.
एक महिन्यामध्ये डॉलरची किंमत तीन रुपयांनी कमी झाली. 3 सप्टेंबरला एका डॉलरची किंमत 55 रुपयांवर होती. आणि आता 52 रुपयाजवळ डॉलरची किंमत आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत घटनं म्हणजे रुपया मजबूत झाल्याचं लक्षण आहे.
पेट्रोलच्या किंमती कमी होत नसली तरीदेखील तेल कंपन्यासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर कमी करून ग्राहकांना कधी दिलासा मिळणार? असा प्रश्न निर्माण होतोय.
First Published: Wednesday, October 3, 2012, 20:17