Last Updated: Thursday, November 15, 2012, 22:11
www.24taas.com, नवी दिल्ली राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षात अखेर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस समन्वय समितीचे ते अध्यक्ष असतील. या समितीत एकूण सहा सदस्य असणार आहेत. राहुल गांधी, दिग्विजय सिंह, मधूसुदन मिस्त्री, जयराम रमेश आणि जनार्दन द्विवेदी या समितीमध्ये असतील.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी पक्षाच्या जबाबदारीचा मोठा भार पेलताना दिसणार आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेस समन्वय समितीचा अध्यक्ष नियुक्त करण्यात आल्याची घोषणा आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी केलीय.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष असलेल्या द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजकुंडमध्ये झालेल्या संवाद बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यासंबंधी घोषणा केलीय. २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठई एक निवडणूक समन्वय समिती आणि तीन उपसमित्यांची निर्मिती करण्यात आलीय.
४२ वर्षीय राहुल गांधी यांना दिलेली ही मोठी जबाबदारी पक्षातील त्यांचं स्थानही स्पष्ट करतेय. यामुळेच येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून राहुल गांधी समोर आले तर अर्थातच आश्चर्य वाटायला नको.
First Published: Thursday, November 15, 2012, 22:11