Last Updated: Friday, September 28, 2012, 08:51
www.24taas.com, नवी दिल्लीमुंबईत येणाऱ्या बिहारी नागरिकांना राज ठाकरेंनी घुसखोर म्हटलं होतं. बिहारी नागरिकांविरोधात केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.
पी.एस शर्मा नावाच्या वकिलाने राज यांच्याविरोधात दिल्लीच्या कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करा, असा आदेश दिल्लीतील न्यायालयाने पोलिसांना दिला.
मुंबईत झालेल्या हिंसाचारानंतर राज ठाकरे यांनी ३१ ऑगस्टला गिरगाव ते आझाद मैदान असा मोर्चा काढला होता. यावेळी केलेल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक आणि देशद्रोही विधान केल्याची तक्रार वकील शर्मा यांनी दाखल केली होती. राज ठाकरे यांनी हे विधान दिल्लीत केले नाही, तसेच स्थानिक वृत्तपत्रांमध्येही त्याविषयी बातमी आली नसल्याने त्यांच्याविरुद्ध ‘एफआयआर` दाखल करण्यात कायदेशीर अडथळे असल्याचे दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
First Published: Friday, September 28, 2012, 08:51