बलात्काराच्या आरोपीला जिवंत जाळलं, Rapist burnt to death by victim in MP

बलात्काराच्या आरोपीला जिवंत जाळलं

बलात्काराच्या आरोपीला जिवंत जाळलं
www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ

मध्यप्रदेशच्या कटनी जिल्ह्यातील बडवाराजवळच्या एका गावात बलात्काराच्या एका आरोपीला जिवंत जाळण्यात आलंय. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी जामिनावर सुटलेल्या आरोपीला जाळलंय.

एसपी राजेश हिंगडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगहरामध्ये राहणाऱ्या संदीप ऊर्फ राजू विश्वकर्मा (३८ वर्ष) याच्यावर गावातीलच एका तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राजूला अटक करून तुरुंगात टाकलं होतं. परंतु, एक महिन्यापूर्वी राजूला जामीन मंजूर झाल्यानंतर तो तुरुंगाबाहेर आला.

गुरुवारी, यानंतर तडजोडीच्या बहाण्यानं मुलीनं राजुला आपल्या घरी बोलावून घेतलं. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांत आणि राजूमध्ये बराच वाद झाला... मुलीच्या कुटुंबीयांनी तिथंच त्याच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिलं. या घटनेत हा तरुण ९० टक्के भाजला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं गेलं. परंतु शुक्रवारी सकाळी राजूचा मृत्यू झाला.

यासंदर्भात बडवारा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय. परंतु, यामध्ये अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दुसरीकडे, जबलपूर रेंजचे डीआयजी मकरंद देऊस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूनं मृत्यूपूर्वी दिलेल्या जबानीत तडजोडीसाठी मुलीच्या भावांनी त्याच्याकडे दोन लाखांची मागणी केल्याचं सांगितलं. परंतु, पैसे देण्यास नकार दिल्यानं आपल्याला पेटवून देण्यात आलं, असा जबाबा राजूनं दिला होता. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, September 6, 2013, 19:37


comments powered by Disqus