Last Updated: Tuesday, November 13, 2012, 19:19
www.24taas.com, नवी दिल्ली पाकिस्तानातील कराची येथे तळ ठोकलेला इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी रियाझ भटकळ याने येत्या बुधवारी १४ नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीत ऐन दिवाळीत बॉम्बस्फोटांचा धमाका घडवण्याचा कट रचल्याची माहिती ‘रॉ’ने दिली. या गुप्तचर संघटनेने सावधगिरीचा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ असून दिल्ली पोलिसांना त्या दृष्टीने दक्ष राहण्याचे आदेश आज देण्यात आले.
बुधवारी दिल्लीतील प्रगती मैदानावर भरत असलेल्या ‘ट्रेड फेअर’वर आणि दिल्ली मेट्रोवर दहशतवादी हल्ला चढवण्याची दाट शक्यता ‘रॉ’ने व्यक्त केली आहे. सौदी अरेबियाच्या रियाध या राजधानीतील एका हिंदुस्थानी कर्मचार्याने दूरध्वनीवरून दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत धमाका उडवण्याच्या कटाबाबत काही अज्ञात व्यक्ती चर्चा करीत असल्याचे त्याला आढळले होते.
त्यानुसार गेल्या आठवड्यात ‘रॉ’ आणि दिल्ली पोलिसांच्या एका संयुक्त पथकाने रियाधला जाऊन त्या कर्मचार्याची भेट घेतली. त्याने पाहिलेल्या संशयास्पद व्यक्तींपैकी एकाचे वर्णन रियाझ भटकळ या दहशतवाद्याशी जुळणारे आढळले अशी माहिती गुप्तचर अधिकार्यांनी दिली.
First Published: Tuesday, November 13, 2012, 15:55