`स्कायडायव्हिंग` करताना पत्नीचा पतीच्या डोळ्यांदेखत मृत्यू, skydiver plunges 10,000 feet to death in

`स्कायडायव्हिंग` करताना पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा मृत्यू

`स्कायडायव्हिंग` करताना पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, सालेम

`स्कायडायव्हिंग` करताना पुरेशी काळजी न घेतल्यानं एका २६ वर्षीय विवाहीत तरुणीला आपल्या प्राणांना मुकावं लागलंय. तामिळनाडूच्या सालेम भागात गुरुवारी ही घटना घडलीय.

मूळची बंगलोरची राम्या ही साहसी तरुणी आपल्या पती विनोदसोबत सालेम विमानतळावर स्काय डायव्हिंगचा थराराचं प्रात्यक्षिक आजमावण्यासाठी गेली होती. विनोद हा एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे तर राम्या ही एक गृहिणी होती. जमिनीपासून १०,००० फुटांवरून विमानातून तिनं खाली उडी मारली... पण, पॅराशूट योग्य पद्धतीनं योग्य वेळी न उघडल्यानं ती धाडकन जमिनीवर कोसळली आणि यातच तिचा मृत्यू झाला.

विमानातून उडी मारल्यानंतर ६,००० फुटांवर असताना `स्काय ड्रायव्हर`नं पॅराशूट उघडणं अपेक्षित होतं. राम्याचा पती विनोद (२८ वर्ष) राम्यानंतर हाच थरार अनुभवणार होता... त्यासाठी तो राम्याची खाली उतरण्याची वाट पाहत होता. `इंडियन स्कायडायव्हिंग आणि पॅराशूट असोसिएशन`चे हे दोघेही सभासद आहेत. आठवड्याभरापूर्वीपासून त्यांनी स्कायडायव्हिंगची इतरांसोबत प्रॅक्टीसही केली होती. मोहन राव (३८) आणि ऐश्वर्या यादव (३३) हे दोघे ट्रेनर राम्याला स्कायडायव्हिंगच्या वेळी सूचना देत होते.

१०,००० फूट उंचीवर पोहचल्यानंतर ट्रेनर्सनं राम्याला खाली उडी मारायला सांगितली. ६,००० फुटांवर पोहचल्यानंतर तिला पॅराशूट उघडायचं होतं जेणेकरून ती जमिनीवर अलगद खाली पोहचली असती. पण पॅराशूटनं ऐनवेळी धोका दिला आणि ते नीट उघडलं नाही... उलट जोरदार हवेमुळे हे पॅराशूट राम्याच्या शरीराभोवती गुंडाळलं गेलं... आणि एका मिनिटांपेक्षा कमी वेळेत राम्या १०,००० फुटांवरून धाडकन जमिनीवर कोसळली. तिला तातडीनं नजिकच्या हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

पॅराशूट उघडलं नाही तर त्यावेळी नेमकं काय करायचं, याबद्दल आपल्याला कोणतीही सूचना ट्रेनर्सनं दिली नव्हती, असं विनोदचं म्हणणं आहे. पोलिसांनी दोन्ही ट्रेनर्सला आपल्या सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक केलीय.

बंगळुरूची `इंडियन स्कायडायव्हिंग आणि पॅराशूट असोसिएशन` (आयएसपीए) या संस्थेतर्फे २५ जानेवरीपासून स्कायडायव्हिंगचं प्रशिक्षण देणं सुरू होतं. हा थरार अनुभवण्यासाठी ११ जण सहभागी झाले होते त्यामध्ये पाच स्त्रियांचा समावेश होता. महत्त्वाचं म्हणजे, आयएसपीए प्रत्येक सभासदाकडून प्रत्येकी ३,००० फुटांवरून डायव्हिंगसाठी १५,५०० आणि १०,००० फुटांवरून डायव्हिंगसाठी ४१,५०० रुपये फी घेतं. परंतु, पुरेशी काळजी न घेतल्यानं काम्याला आपला जीव गमवावा लागलाय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 31, 2014, 11:00


comments powered by Disqus