Last Updated: Thursday, October 31, 2013, 13:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई पाटण्या बॉम्बस्फोटाची बातमी कळल्यानंतरही गृहमंत्र्यांनी ‘रज्जो’ या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चिंगला प्राधान्य दिलं. पण, त्यामुळे गृहमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षतेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. या घटनेमुळे शिंदे यांच्यावर विविध स्तरातू जोरदार टीका करण्यात येतेय.
स्फोटानंतर गृहमंत्री घटनास्थळाला भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सुशील कुमार शिंदेंनी त्याऐवजी मुंबईत येऊन ‘रज्जो’ सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्याला महत्व दिलं. नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील जाहीर सभेच्या अगोदर लागोपाठ आठ बॉम्बस्फोट झाले. त्यात सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जण जखमी झाले होते. पण, ही बातमी वाचत आणि पाहत असताना नागरिकांना दुसरीकडे गृहमंत्री ‘रज्जो’च्या म्युझिक लॉन्चिंगच्या सेटवरही दिसत होते. या दोन्ही घटना परस्परविरोधी होत्या. बॉम्बस्फोटाची तीव्रता लक्षात घेता देशभर अतिदक्षतेचा इशारा गृहमंत्रालयाकडून देण्यात आला होता. मात्र, शिंदे चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक विश्वास पाटील आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासोबत चित्रपटाचं म्युझिक प्रदर्शित करण्यात मश्गुल झाले होते.
यावर, स्पष्टीकरण देताना ‘विश्वास पाटील यांनी हट्टच धरल्यानं नाईलाज झाला. त्यांना केवळ दिलेल्या शब्दामुळेच मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, पण स्फोटाची बातमी समजल्यानंतर मी सातत्यानं तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत होतो... कार्यक्रमादरम्यानही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती’ असं शिंदेंनी म्हटलंय. पण, आपल्या मित्राचा हट्ट गृहमंत्र्यांना चांगलाच महागात पडणार असंच यानंतर सुरू झालेल्या चर्चेमुळे दिसतंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, October 31, 2013, 13:43