`नॅनो`ची मागणी घटली; टाटाचा गुजरात प्लान्ट बंद!, tata shuts nano plant in gujarat for 35 to 40-days

`नॅनो`ची मागणी घटली; टाटाचा गुजरात प्लान्ट बंद!

`नॅनो`ची मागणी घटली; टाटाचा गुजरात प्लान्ट बंद!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

टाटा मोटर्सनं गुजरातच्या सानंद इथं उभारलेला आपला ‘नॅनो’ तयार करणारा प्लान्ट सध्या बंद केलाय. स्वस्त आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी अशी ओळख मिळवणाऱ्या ‘नॅनो’ची घटती मागणी लक्षात घेता कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

‘द इकोनॉमिक टाईम्स’नं दिलेल्या बातमीनुसार, ‘टाटा’ कंपनीचा हा प्लान्ट ३५ ते ४० दिवसांपर्यंत बंद राहू शकतो. कंपनीचा अंदाज थोडा चुकला आणि ‘नॅनो’ची मागणी दिवसेंदिवस कमी होत गेली. शेकडो तयार गाड्या इथं धूळ खात पडल्यात. कंपनीनं गेल्या महिन्यात या प्लान्टची क्षमता आणि उत्पादनाचं काम कमी करणं सुरू केलं होतं.

यापूर्वी, या प्लान्टमध्ये कंपनीच्या २,००० ते २,४०० गाड्या बनवण्याचं काम सुरू होतं. परंतु, आता कंपनीनं हे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतलाय. त्याचाच एक भाग म्हणून प्लान्ट पुढचा महिनाभर बंद राहणार आहे.

कंपनीच्या प्रवक्त्यांनी मात्र, हा प्लान्ट वार्षिक मेन्टेनन्सच्या कारणास्तव बंद राहणार असल्याचं सांगितलंय. यासाठी ३ ते ६ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. पण, मेन्टेनन्ससाठी एवढा कालावधी लागत नसल्याचं ऑटो सेक्टरमधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

या प्लान्टमध्ये वार्षिक अडीच लाख नॅनो कारचं उत्पादन होऊ शकतं मात्र गेल्या वर्षी २१,५३८ गाड्यांचं उत्पादन इथं झालं. विकल्या न गेलेल्या गाड्या आजही इथं पडून आहेत. नॅनोच्या सीएनजी मॉडेललाही ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

तब्बल २००० करोड रुपये खर्चुन ‘टाटा’ कंपनीनं हा प्लान्ट उभारलाय. आता, याच प्लान्टमध्ये टाटा मोटर्स आपल्या नव्या ‘काईट’ या कारच्या उत्पादनाची तयारी करत आहे. त्याशिवाय नव्या ‘सेडान’ या गाडीचंही उत्पादन इथं सुरु करण्यात येईल, अशी चिन्ह आहेत.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 14, 2014, 16:58


comments powered by Disqus