येडियुरप्पा काँग्रेसमध्ये जाणार? - Marathi News 24taas.com

येडियुरप्पा काँग्रेसमध्ये जाणार?

www.24taas.com, बंगळुरू
आत्तापर्यंत आपल्या पक्षातील नेत्यांचं गुणगाण गाणाऱ्या येडियुरप्पांनी ‘यू टर्न’ मारत आपल्याच नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय. भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी रविवारी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना ‘कपटी’ ठरवलंय. एव्हढंच नाही तर सोनिया गांधीवर त्यांनी स्तुतिसुमनंही उधळली आहेत.
 
सुप्रीम कोर्टानं येडियुरप्पा यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळवण्याच्या त्यांची महत्त्वकांक्षा धुसर झाली आहे. त्यामुळे आपला संताप व्यक्त करत त्यांनी आज आपल्या पक्षावर जोरदार टीका केली. पहिल्यांदाच त्यांनी मुख्यमंत्री गौडा यांच्यावर जाहीर टीका करत ‘एका कपटी माणसानं आपलं वचन तर पाळलं नाहीच तर आणखी उपदेश देतोय. हे वर्तन शास्त्रांत वर्णन केलेल्या राक्षसांप्रमाणे आहे’ असं म्हटलंय.
 
येडियुरप्पा म्हणतात, ‘काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांच्यात एक महान गुण आहे. त्या आपल्या पक्षातील आरोपी नेत्यांच्या बचावाची भूमिका घेतात. पण आमच्या पक्षातील लोक असं करत नाहीत.’
 
‘पूर्वी लोक जनतेच्या भल्यासाठी सत्तेत येत होते. पण आता मात्र भ्रष्टाचार करण्यासाठी येतात’, अशा शब्दांत मुख्यमंत्री गौडा यांनी येडियुरप्पांवर शनिवारी टीका केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर खुद्द येडियुरप्पा यांनीच गौडा यांची आपला उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली होती.
 
येडियुरप्पा यांनी शनिवारी शक्तिप्रदर्शनासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर कमीत कमी सात मंत्र्यांचा राजीनामा आपल्याकडे मागवला होता. यासंदर्भात ते म्हणाले, ‘अनेक मंत्र्यांनी माझ्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर पक्षाविरोधी काम केल्याचे खोटे आरोप केल्यानं ते नाराज आहेत. योग्य वेळी मी त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेईन.’
 
 

First Published: Sunday, May 13, 2012, 20:46


comments powered by Disqus