एअर इंडियाच्या प्रवाशांना दिलासा - Marathi News 24taas.com

एअर इंडियाच्या प्रवाशांना दिलासा

www.24taas.com, मुंबई
 
एअर इंडियाच्या प्रवाशांना थोडा दिलासा मिळालाय. एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना संपाच्या नवव्या दिवशी सुरुवात झालीय. अमेरिका आणि युरोपमधली तात्पुरती विमानसेवा सुरु झालीय. प्रवासी  वाहतुकीसाठी विशेष विमानांचा वापर केला जाईल, अशी माहिती एअर इंडियानं दिली आहे.
 
दिल्ली-पॅरिस-न्यूयॉर्क, दिल्ली-फ्रॅंकफर्ट-शिकागो आणि दिल्ली-लंडन या आंतरराष्ट्रीय मार्गांवरील फे-यांसाठी ‘बोइंग-777-300 इआर’ या विशेष विमानाचा वापर 16 ते 20 मे या कालावधीत केला जाणार आहे.
 
एअर इंडिया पायलट्सच्या संपाचा आज नववा दिवस आहे. गेले आठ दिवसांपासून हवाई वाहतुकीला संपाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता तात्पुरती विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. ‘हळूहळू संपूर्ण सेवा पूर्ववत होईल’, असा विश्वास एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. तसंच आम्हाला सरकारनं चर्चेला बोलावल्यास आम्ही चर्चा करण्यास तयार असल्याचं ‘इंडियन पायलट गिल्ड’चे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.
 
 
 

First Published: Wednesday, May 16, 2012, 17:01


comments powered by Disqus