... तर अपक्ष म्हणून निवडणूक लढणार - संगमा - Marathi News 24taas.com

... तर अपक्ष म्हणून निवडणूक लढणार - संगमा

 www.24taas.com, नवी दिल्ली 
 
राष्ट्रपती पदासाठी आपल्याच पक्षातून होणाऱ्या विरोधानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी. ए. संगमा यांनी, वेळ पडल्यास राष्ट्रपती पदाची निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याची तयारी दाखवली आहे. ते एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद यादव यांनी नुकतंच संगमा यांच्या नावाला आक्षेप घेतला होता.
 
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पी. ए. संगमा यांचं नाव पुढं आलं. जयललिता, जया बच्चन आणि नवीन पटनायक यांनी उघडउघडपणे संगमा यांना आपली पाठिंबा व्यक्त केला. पण, पक्षातीलच काही नेत्यांनी संगमा यांच्या नावाला आक्षेप घेतला. याबद्दल विचारलं असता संगमा म्हणाले, ‘मागे हटण्याचं काही कारणच नाही. मी जयललिता आणि नवीन पटनायक यांना निराश करणार नाही. याचा अर्थ आहे की, जर वेळ आली तर ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवीन.’
 
लोकसभेचे माजी अध्यक्ष संगमा यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यासहीत अन्य काही नेत्यांना आपण भेटणार असल्याचं सांगितलं. एका आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती पदं मिळावं, यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. ‘जयललिता आणि नवीन पटनायक यांनी जाहिररित्या मला पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि इतर राजकीय पक्षांकडूनही मला पाठिंबा मिळतोय. त्यामुळे पाऊल मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. संगमा यांनी भाकप नेते डी. राजा यांचीही नुकतीच भेट घेतली आहे. जयललिता यांनी आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव आणि इतर काही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

First Published: Tuesday, May 22, 2012, 12:43


comments powered by Disqus