Last Updated: Tuesday, May 22, 2012, 12:51
www.24taas.com, नवी दिल्ली लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी पदग्रहण केल्यानंतर ३५ महिन्यांत तब्बल २९ वेळा विदेश दौरा केल्याची माहिती समोर आलीय. याचाच अर्थ जेमतेम ३७ दिवसांमध्ये त्यांनी एक तरी परदेश दौरा केलाय.
आरटीआय कार्यकर्ते सुभाष चंद्र अग्रवाल यांनी यासंबंधी केलेल्या विचारणेत ही माहिती समोर आली आहे. मीरा कुमार यांनी वेगवेगळ्या पक्षांतील खासदार आणि लोकसभा सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर २८ देशांचा दौरा केला आहे. ज्यासाठी खर्च झालेत फक्त १० कोटी रुपये...
लोकसभा सचिवालयातून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी सर्वाधिक वेळा दौरे केलेला देश आहे, स्वित्झर्लंड.... ‘आंतर संसदीय यूनियन’च्या (IPU) वेगवेगळ्या कामांसाठी त्यांनी हे दौरे केलेत. मीरा कुमार यांनी ३ जून २००९ रोजी लोकसभा अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारलेला आहे. तेव्हापासून ३० एप्रिलपर्यंत त्या तब्बल १४६ दिवस परदेश दौऱ्यावरच होत्या. ‘आयपीयू’च्या कामांसाठी त्यांनी चार देशांत सात वेळा फेऱ्या मारल्यात. चार वेळा स्वित्झर्लंड तसंच अमेरिका, पनामा आणि थायलंडमध्ये एक-एक वेळा त्यांचा दौरा झालाय. याशिवाय कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या कामांसाठी त्रिनिदाद, टोबैगो, ब्रिटन, श्रीलंका, आईल ऑफ मॅन, स्वाझीलँड, केनिया आणि टांझानिया या देशांत दौरेही केले आहेत.
First Published: Tuesday, May 22, 2012, 12:51