आरोप सिद्ध झाले तर राजीनामा - पीएम - Marathi News 24taas.com

आरोप सिद्ध झाले तर राजीनामा - पीएम

www.24taas.com, नवी दिल्ली 
 
टीम अण्णांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तर दिले आहे. टीम अण्णांनी केलेले आरोप बेजबाबदारपणे केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तसंच आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेऊ, असेही ते म्हणाले.
 
माझ्यावर आणि माझ्या सहका-यांवर करण्यात आलेले आरोप बेजबाबदापणे केले असून ते दुर्भाग्यपूर्ण असल्याचं ते म्हणाले. कोळसा खाण वाटपप्रकरणी पंतप्रधानांवर टीम अण्णांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
 
टीम अण्णाने भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या यादीत आपले नाव सामील केल्यानंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आक्रमक भूमिका घेत आरोप करणार्‍यांना आव्हान दिले. मंगळवारी म्यानमारहून परततताना ते म्हणाले, आरोप सिद्ध झाले तर मी राजकीय संन्यास घेईन. दरम्यान, पंतप्रधान प्रामाणिक आहेत तर त्यांनी ते सिद्ध करावे, असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले. शनिवारी टीम अण्णाने पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्रिमंडळातील १५ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
 
पंतप्रधानांच्या या आक्रमक वक्तव्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी तेवढय़ाच आक्रमकतेने डॉ. सिंग यांना आव्हान दिले. एवढे प्रामाणिक असाल तर पंतप्रधान आरोपांची चौकशी का होऊ देत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमचे आरोप निराधार नाहीत. कॅगच्या अहवालात जे नमूद आहे तेच आम्ही जाहीर केले आहे, असे केजरीवाल म्हणाले.
 
दरम्यान, मंत्र्यांवर केलेल्या आरोपांची माहिती अण्णांना नसल्याचे प्रशांत भूषण यांनी स्पष्ट केले. जे दस्तऐवज आपण मिळवले ते सर्व इंग्रजीतून आहेत आणि अण्णा इंग्रजी वाचू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना या आरोपांची सखोल माहिती नाही. हे सर्व दस्तऐवज हिंदीत भाषांतरीत केले जातील, असे भूषण यांनी सांगितले.
 
व्हिडिओ पाहा...
 

First Published: Wednesday, May 30, 2012, 07:56


comments powered by Disqus