'पंतप्रधानांबद्दल आदर, पण चौकशी व्हायलाच हवी' - Marathi News 24taas.com

'पंतप्रधानांबद्दल आदर, पण चौकशी व्हायलाच हवी'

 www.24taas.com, नवी दिल्ली
 
भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याची घोषणा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केल्यानंतर टीम अण्णानं या आरोपांच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केलीय. इतकंच नाही तर, हे आरोप खोटे ठरले तर आपल्याला खूप आनंद होईल, असंही टीम अण्णानं म्हटलंय.
 
आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या टीकेनंतर मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच टीम अण्णाला सरळसरळ आव्हान दिलं होतं. त्यानंतर टीम अण्णानं एक पाऊल मागं घेऊन आपल्या मनात पंतप्रधानांबद्दल आदर असल्याचं सांगितलंय. सोबतच, भ्रष्टाचारी मंत्र्यांविरुद्ध कुठे तक्रार दाखल करावी, असा प्रश्नही यावेळी अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केलाय. तसंच पंतप्रधानांवर केलेला भ्रष्टाचाराचा आरोप हा आपला आरोप नसून तसा उल्लेख 'कॅग' रिपोर्टमध्ये असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. 'पंतप्रधानांवर केलेले आरोप खोटे ठरले तर आपल्यालाही आनंद होईल पण हे सिद्ध कसं होणार? यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्याची गरज आहे,' अशी मागणी केजरीवाल यांनी केलीय. ‘पंतप्रधानांवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बेजबाबदार आहेत असं पंतप्रधान म्हणत असतील तर याचाच अर्थ ते कॅगलाही बेजबाबदार मानतात’ असं केजरीवाल यांनी म्हटलंय.
 
काल पंतप्रधानांनी जनतेलाच आव्हान करत, माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर मी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन आणि देश मला जी सजा देईल ती मला मान्य असेल, असं म्हटलं होतं. यावर टीम अण्णांनी पंतप्रधानांवर लावलेल्या आरोपांवर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण खरं-खोटं सिद्ध होण्यासाठी अगोदर या आरोपांची चौकशी होणं आवश्यक असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश संतोष हेगडे यांनीदेखील टीम अण्णांची मागणी अधोरेखित केली आहे.
 
.

First Published: Wednesday, May 30, 2012, 18:48


comments powered by Disqus