'२०१४ पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान' - Marathi News 24taas.com

'२०१४ पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान'

 www.24taas.com, नवी दिल्ली 
 
राष्ट्रपतीपदाची निवडणुकीवरून दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलाय. २०१४पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान राहतील, असं काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मनमोहन सिंग यांचं नाव राष्ट्रपतीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालंय.
 
आज सकाळीच प्रणव मुखर्जी यांनी सोनियांची गांधींची १० जनपथवर भेट घेतली होती. पण, अजूनही राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांची नावं निश्चित झाली नाही, नावांवर अजूनही चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय.
 
दरम्यान, प्रणव मुखर्जी यांच्या नावाला द्रमुकनं आपला पाठिंबा जाहीर केलाय. लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांनी आपण काँग्रेससोबतच असल्याचं जाहीर केलंय. तर, समाजवादी पार्टीनं प्रणव मुखर्जींच्या नावाला पाठिंबा जाहीर केला नसला तरी मुखर्जींना सपाचा विरोधही नसल्याचं सुत्रांनी म्हटलंय. दरम्यान, सोनिया गांधींनी आम्हाला चर्चेला बोलावलं तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असं समाजवादी पार्टीच्या सूत्रांकडून सांगण्यात आलंय. तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार दुपारनंतर सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचं समजतंय. त्यामुळे शरद पवार कोणती भूमिका घेतायत याकडे आता लक्ष लागलं आहे. चर्चेचा खल सुरूच आहे. आज संध्याकाळी काँग्रेस कोअर कमिटीची बैठक होणार आहे. पण, यामुळे राष्ट्रपती पदाबाबतची उत्सुकता मात्र ताणली गेलीय.
 
.

First Published: Thursday, June 14, 2012, 14:36


comments powered by Disqus