'कस्तुरबा गांधीं'चं कुंकू गेलं चोरीला - Marathi News 24taas.com

'कस्तुरबा गांधीं'चं कुंकू गेलं चोरीला


www.24taas.com, वर्धा
 
वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमातून कस्तुरबा गांधी यांची कुंकवाची डबी चोरीला गेलीय. दीड वर्षापूर्वी महात्मा गांधींचा चोरीला गेलेला चष्मा अजूनही सापडलेला नसतानाच आता कस्तुरबा गांधींची कुंकवाची डबीही भामट्यानं लंपास केलीय.
 
डबी चोरीला जाण्याचा खुलासा महात्मा गांधी यांच्या सेविका कांचनबेन शाह यांनी केला आहे. सेवाग्राम आश्रमाच्या परिसरात महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधींचीही कुटी आहे. या कुटीत कस्तुरबा गांधी यांच्या वस्तूंचा संग्रह आहे. या संग्रहात कुंकवाची डबी 1984 मध्ये आणण्यात आली होती.
 
बापूजींचा चष्मा चोरीस गेल्यानंतरही सेवाग्राम आश्रमाची सुरक्षा वाढविण्यात आली नाही. त्यामुळं चोरीच्या घटनांमध्ये  दिवसेंदिवस  वाढ होतेय. राज्य सरकारनं चष्मा चोरीचा तपास CID ला दिला होता. मात्र अजूनही याबाबत कोणताही सुगावा लागला नाही. कुंकवाची डबी चोरीला गेल्यानं पुन्हा एकदा सेवाग्राम आश्रमाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

First Published: Monday, June 18, 2012, 21:52


comments powered by Disqus