एकटेपणा बेतू शकतो जीवावर - Marathi News 24taas.com

एकटेपणा बेतू शकतो जीवावर

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
एकटं राहणं हे किती धोकादायक असू शकतं? ते तुम्हाला मरणाच्या दारापर्यंत पोहचवू शकतं का? तर याचं उत्तर आहे... होय.  एकटं राहणं हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. त्यातूनही स्ट्रोक आणि हार्ट पेशंटना हे जास्त धोकादायक ठरू शकतं, असं नुकत्याच एका अभ्यासात म्हटलं गेलंय.
 
ब्रिघम अॅन्ड विमेन्स हॉस्पिटल (BWH)चे अभ्यासकांनी ४४,५७३ जणांच्या केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढलाय. ४ वर्ष हा अभ्यास सुरू होता. सहभागी झालेल्या लोकांपैकी १९ टक्के लोक हे एकटे राहणारे होते. यामध्ये अभ्यासकांना एकट्या राहणा-या लोकांमध्ये तणावाचं प्रमाण जास्त आढळलं तसंच अशा लोकांच्या मृत्यूची टक्केवारी ही एकटं न राहणा-या लोकांपेक्षा जास्त असल्याचं त्यांनी आपल्या अहवालात नमूद केलंय. यामधल्या अनेक जणांच्या मृत्यूचं कारण होतं... ह्रदयाच्या कार्यात बिघाड. यामध्ये व्यक्तीच्या वयोमानानुसारही फरक पडत असल्याचं जाणवलं. ४५ ते ८० वर्षांच्या व्यक्तींमध्ये केलेल्या अभ्यासात ह्रदयात झालेल्या बिघाडामुळे एकट्या राहणा-या व्यक्तींचा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त होतं. मात्र, ८० वर्षांच्या पुढील असलेल्या व्यक्तींबाबत मात्र हे निश्चित सांगता येत नव्हतं.
 
‘मुळातच, तणावाचं एक कारण हेही असू शकतं की तुम्ही एकटे राहता. ते सामाजिक कारणांमुळे असो किंवा तुमच्या कामाच्या किंवा ऑफिसच्या कारणांमुळे. आणि याच तणावाचा परिणाम तुमच्या ह्रदयावरदेखील जाणवतो. तसंच जे लोक एकटे राहतात त्यांना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा आवश्यक असेल अशावेळी तातडीनं वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध न झाल्यामुळेही हे प्रमाण जास्त असू शकतं’, असं ब्रिघमचे कार्डिओलॉजिस्ट जॅकॉब उडेल यांनी म्हटलंय.
 
.

First Published: Tuesday, June 19, 2012, 15:03


comments powered by Disqus