'...तर सोनियांना कुणीच रोखू शकलं नसतं' - Marathi News 24taas.com

'...तर सोनियांना कुणीच रोखू शकलं नसतं'

www.24taas.com, नवी दिल्ली
 
२००४ साली सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं की नाही? या प्रश्नावर तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांची भूमिका काय होती... या प्रश्नाचं उत्तर अजूनही गुलदस्त्यातच होतं. पण खुद्द कलामांनीच या वादावरचा पडदा उठवलाय. ‘टर्निंग पॉईंटस्, अ जर्नी थ्रू चॅलेंजेस’ या पुस्तकात कलामांनी याबद्दलचा खुलासा केलाय. जर सोनियांना पंतप्रधान व्हायचं असतं तर त्यांना कुणीच रोखू शकलं नसतं, अशी स्पष्टोक्तीच त्यांनी या पुस्तकात दिलीय.
 
१३ मे २००४ रोजी लागलेल्या निवडणूक निकालानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर जाऊनही  सोनियांनी पंतप्रधान पद न स्विकारण्याचा निर्णय घेतला होता. सोनियांनी पंतप्रधान पद स्विकारावं यासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता कित्येक नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. सोनियांनी आपल्याच नाव पुढे केलं असतं तर त्यांची पंतप्रधानपदी नेमणूक करण्याशिवाय माझ्याकडेही दुसरा कुठलाच मार्ग राहिला नसता, असं कलाम यांनी या पुस्तकात म्हटलंय. सोबतच त्यांनी असंही म्हटलंय की, ‘१८ मे २००४ रोजी सोनियांनी मला भेटून पंतप्रधान पदासाठी मनमोहन सिंग यांचं नाव सुचवलं तेव्हा तर मला आश्चर्याचा झटकाच बसला’.
 
माजी राष्ट्रपती कलाम यांनी यूपीए सरकारबरोबरचा आपला पहिलावहिला अनुभव या पुस्तकात मांडलाय. यूपीए सरकारनं मांडलेल्या ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट बिला’लाही आपला विरोध होता, अस अब्दुल कलाम यांनी स्पष्ट केलंय.
 
.
 

First Published: Saturday, June 30, 2012, 11:59


comments powered by Disqus