अबब.... पद्मनाभाचा खजिना १० लाख कोटींचा! - Marathi News 24taas.com

अबब.... पद्मनाभाचा खजिना १० लाख कोटींचा!

www.24taas.com, तिरुअनंतपुरम
केरळच्या ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिरात सापडलेला खजिना दहा लाख कोटींचा असल्याची शक्यता सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या टीमने व्यक्त केली आहे. ही टीम येत्या ८ ऑगस्टला आपला अहवाल कोर्टासमोर सादर करणार आहे.
गेल्या वर्षीपासून खजिन्याची मोजदाद सुरू आहे. या प्रचंड खजिन्यामुळे या मंदिराभोवती सध्या ट्रीपल सेक्युरिटी आहे. खजिन्याची मोजदाद करण्यापूर्वी त्याचे मूल्य एक लाख कोटीपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण प्रत्यक्षात त्याचे मूल्य सुमारे १० लाख कोटी असल्याचा अंदाज या टीमने व्यक्त केला आहे.
 
 
मंदिराच्या तळघरांतील सहा कोठारांमध्ये असलेल्या खजिन्याची देखरेख आणि मोजदाद करण्यासाठी कोर्टाने समिती नेमली आहे. खजिन्यासंबंधीची माहिती केवळ कोर्टाला देण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत सहापैकी पाच कोठारे उघडण्यात आली असून, त्यातील खजिना भारतीय पद्धतीने मोजण्यात आला आहे. त्याआधारेच या समितीने आपला प्राथमिक अहवाल तयार केला आहे.
 
आज अ क्रमांकाचे कोठार उघडून समितीने त्यातील सोन्या-चांदीची आभूषणे, सोन्याचे साखळदंड, जडजवाहीर, देवतांच्या मूर्ती आदींची पुन्हा एकदा पाहणी केली. इतर चार कोठारांचीही अशीच पाहणी केली जाणार आहे. ब कोठार अद्याप उघडण्यात आलेले नाही. पहिल्या पाच कोठारांतील मौल्यवान वस्तूंची मोजदाद पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते न उघडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. हे कोठार तीनशे ते चारशे वर्षांपासून उघडण्यात आले नसावे, असा अंदाज आहे.
 
 
त्रावणकोर राजाच्या वारसांनीही ते उघडण्यास विरोध दर्शविलेला आहे. संपूर्ण खजिन्याची वैधानिक पद्धतीने मोजदाद करण्यासाठी जर्मनीतून खास उपकरणे मागविण्यात आली आहेत. तसेच काही परदेशी तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. ही मोजदाद पूर्ण होण्यासाठी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागू शकतो, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

First Published: Friday, July 6, 2012, 16:09


comments powered by Disqus