कसाबपेक्षा जिंदालची ऐष! बिर्याणी, मोगलाई डिश - Marathi News 24taas.com

कसाबपेक्षा जिंदालची ऐष! बिर्याणी, मोगलाई डिश

www.24taas.com, नवी दिल्‍ली
 
२६ /११ या मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार अबू जिंदाल याची सध्या दिल्लीत ऐष सुरू आहे. मुंबईवरील हल्ल्याचा दोषी अजमल कसाब हा कारागृहात राजेशाही थाट उपभोगत होता. आता तर त्याच्या पुढेचे पाऊल जिंदालचे आहे. दिल्ली पोलीस जिंदालची खाण्याचीपिण्याची खास व्यवस्था करीत आहे. तसेच त्याला उकाड्याचा त्रास होवू नये म्हणून वातानुकुलीत रूममध्ये ठेवण्यात आले आहे. हे वृत्त कोलकात्यातील एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
 
किरकोळ गुन्ह्यातील आरोपींच्या तोंडून सत्य वदवण्यासाठी ‘थर्ड डिग्री’चा वापर करणारे पोलीस अतिरेक्यांपुढे मात्र आपला खाक्या विसरले आहेत. जशी शाही बडदास्त मुंबई पोलीस कसाबची ठेवत आहेत तोच पाहुणचार दिल्ली पोलीस अबू जिंदालला देत आहेत. त्याची कबुली देताना एका पोलीस अधिकार्‍याने अजब दावा केला. म्हणे अबूचा मूड चांगला राहावा आणि त्याच्याकडून अनेक कटांचा उलगडा व्हावा म्हणूनच आम्ही हा फंडा अवलंबलाय. एवढेच नाही तर अबूभोवती पाहार्‍यावर जे पोलीस आहेत त्यांनाही अबूबरोबर चेष्टामस्करी करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत, असे या वृत्तपत्रात म्हटले आहे.
 
कसाबवर सरकारने तब्‍बल १६ कोटींपेक्षा जास्‍त रुपये खर्च केले आहेत.  दिल्ली पोलिसांनी खास एसी खोलीत सोय केली आहे. ‘खान मार्केट’मधून त्याच्यासाठी मटण, बिर्याणी आणि मोगलाई डिश मागवल्या जात आहेत.  सुरुवातीला अबूला इतर कैद्यांप्रमाणे दालरोटी देण्यात आली. परंतु, त्‍याने ती खाल्‍ली नाही. हे जेवण तो खातही नव्‍हता. तसेच काही बोलायलाही तयार नव्हता. नंतर बिर्याणी मिळायला लागल्यापासून तो मोकळेपणाने बोलतोय. त्याचा रागही कमी झालाय, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला.
 
‘२६/११’च्या हल्ल्यानंतर आपण कराचीत लग्न केल्याची माहिती अबूने चौकशीत दिली आहे. बीडमधील शाळेतल्या आठवणी तसेच बायको, मुलांबाबतही तो भरभरून बोलत असतो.

First Published: Sunday, July 8, 2012, 15:41


comments powered by Disqus