मुलांना बुद्धीमान बनवतात पाळीव प्राणी - Marathi News 24taas.com

मुलांना बुद्धीमान बनवतात पाळीव प्राणी

www.24taas.com, लंडन
 
आपल्या मुलांना बुद्धीमान बनवायचं असेल तर आता त्यांना त्यांच्या वाढदिवसाला किंवा असंच एखादं कारण शोधून एखादा पाळीव प्राणी भेट म्हणून द्या... कारण, एका संशोधनात हे सिद्ध झालंय की पाळीव प्राण्यांसोबत राहून मुलं अधिक बुद्धीमान बनतात.
 
‘पेटस् अॅट होम’ नावाच्या संस्थेनं नुकतीच एका पाहणी केली. त्यानुसार, त्यांच्या असं लक्षात आलंय की ७९ टक्के मुलांमध्ये पाळीव प्राण्यांच्या सहवासात राहून घरच्या अभ्यासात खूपच सकारात्मक बदल घडून आले तसंच शाळेतल्या परिक्षांमध्येही या मुलांनी उत्तम गुण पटकावले.
 
या परिक्षणात असंही लक्षात आलंय की, ज्या मुलांनी उंदीर पाळले होते ती मुलं आपल्या मांजर किंवा कुत्रा पाळणाऱ्या मित्रांपेक्षा अभ्यासात जास्त एकाग्रता प्राप्त करू शकले. वन्यजीवांवर एक कार्यक्रम सादर करणाऱ्या मायकल स्ट्रेशान या अँकरच्या मतानुसार, पाळीव प्राणी घरात आणणं हीच एखाद्या कुटुंबाला आनंद देणारी गोष्ट असते. या पाळीव प्राण्यांबरोबर खेळताना लहान मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते. एकलकोंड्या मुलांसाठीही हे प्राणी महत्त्वाचे ठरतात. दुसऱ्यांसाठी या मुलांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण व्हायला मदत होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही दुणावतो. घरातून बाहेर पडून मातीतले खेळ खेळण्यासाठीही मुलांना आनंद वाटू लागतो. मग काय, तुमच्या घरात कधी येतोय एखादा पाळीव प्राणी...
 
.

First Published: Wednesday, July 18, 2012, 12:40


comments powered by Disqus