पावसाळा : आजारांवर कशी कराल मात? - Marathi News 24taas.com

पावसाळा : आजारांवर कशी कराल मात?

www.24taas.com, मुंबई
 
पावसाळा सर्वांनाच आवडतो. प्रचंड उत्साह व आनंदाचा ऋतू म्हणजे पावसाळा. त्यामुळे अबला-वृद्धांना पावसाचे खास आकर्षण असते. असे असले तरीही आरोग्याची सर्वाधिक काळजी घेण्याचा ऋतूही पावसाळाच असतो. या ऋतूत पाण्यापासून होणा-या आजारांपासून बचावाची जशी आवश्यकता असते तशीच आवश्यकता असते, ती डासांपासून बचावाची. पिण्याचे पाणी दूषित असल्यास डायरिया, टायफॉईड, कावीळ, मलेरिया, डेंग्यू तसेच ऍलर्जी यासारख्या आजारांची लागण होऊ शकते. तर सर्दी, खोकला व तापाची लागण होण्याचीही दाट शक्यता असते.
 
पावसाळ्यात घरांच्या आसपासच्या परिसरात पाणी साचून राहणार नाही. तसेच परिसर स्वच्छ राहील याची काळजी घेण्याची खास आवश्यकता असते. रिकामे जुने डबे, टायर, नारळाच्या करवंट्या किंवा सांडपाण्याची डबके आदींवर कीटक नाशक औषधांची फवारणी करण्याची आवश्यकता असते.
 
बाहेरचे व उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे पावसाळ्यात शक्यतोवर टाळावे, सलग संततधार पाऊस सुरू असल्यास नळांद्वारे येणारे पाणी गढूळ येण्याचीही दाट शक्यता असते. हे पाणी गाळून, उकळून तसेच निर्जंतुक करून पिणे कधीही उत्तम. आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घेणे व औषधे घेण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी काळजी घेणे कधीही श्रेयष्कर.
 
 
पावसाळ्यात प्रामुख्याने पाण्यामुळे दोन प्रकारचे आजाराचे उद्‌भवू शकतात. पहिला म्हणजे दूषित जलजन्य आजार, तर दुसरा किटकजन्य आजार. जलजन्य आजार पावसाचे पाणी हे जमिनीवर पडण्यापूर्वी शुद्ध असते परंतु तेच पाणी जमिनीवर पडताच मातीतील जीवाणू, विषाणू, रसायने मिसळून हे पाणी दुषित होते. हे दुषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यास यापासून साथीचे आजार उद्‌भवतात. त्यात गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण, टायफॉईड, कावीळ या आजारांचा समावेश होतो. पावसाळ्यात माशांचे प्रमाण जास्त होत असल्याने घरातील अन्न पदार्थांवर माशा बसू नयेत यासाठी ते झाकून ठेवावेत.
 
 
लहान मुले जेवण करतांना पदार्थांवर माशा बसू नयेत यासाठी स्वत: पालकांनी लक्ष द्यावे. तसेच पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत.  गाड्यांवरील असुरक्षित ज्यूस, कापून ठेवलेले फळे खावू नयेत कारण त्यावर माशा बसून ती दूषित झालेली असू शकतात. शौचास जावून आल्यानंतर व जेवणापूर्वी प्रत्येकांनी हात साबणाने व कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. साबणाने हात धुताना हात साबणाचा फेस होईपर्यंत साधारण एक मिनीट दोन्ही बाजूने स्वच्छ धुवून घ्यावेत.
 
जंतू हे तळहातावर प्रामुख्याने नखाच्या खाली राहात असल्याने नखे वरचेवर काढावीत.  दुषित पाण्यामुळे लहान मुले अथवा वृद्ध यांना उल्टी, संडासचा त्रास झाल्यास त्यांच्यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रशमाण कमी होवून तात्काळ तीव्र स्वरुपाची जलशुष्कता निर्माण होवू शकते. त्यामुळे त्यांना त्वरित दवाखान्यात न्यावे. मीठ+साखर+पाणी या जलसंजीवनीचा किंवा ओ.आर.एस. पावडरचा आवश्यकतेनुसार वापर करावा.
 
 
पावसाळ्यामध्ये दूषित जलजन्य आजाराप्रमाणेच पावसाळ्यात डासाचे प्रमाण वाढत असल्याने मलेरिया, डेंग्यू, चिकुन गुनिया या आजाराचा उद्‌भव होवू शकतो. डेंग्यू, चिकुन गुन्या हा आजार एडीस एजिप्ती हा डास चावल्यामुळे होतो. हा डास फक्त दिवसा चावतो आणि घरातील अडगळीच्या ठिकाणी बसतो.  त्यासाठी घरातील पाण्याच्या टाक्या, हौद, रांजण, गच्चीवरील टाक्या झाकणाने अथवा घट्ट कपड्याने किंवा पत्र्याने झाकून ठेवावेत.
 
घरातील कुलर्समधील पाणी दर तीन-चार दिवसांनी बदलून घ्यावे. आवश्यकतेनुसार धुर फवारणीसाठी कर्मचारी आल्यानंतर धूर फवारणी करुन घ्यावी. तत्पूर्वी अन्न पदार्थ झाकून ठेवावेत तसेच दार, खिडक्या 20 मिनीटे बंद करुन लहान मुलांसह सर्वांनी घराबाहेर थांबावे व प्रशासनास सहकार्य करावे.
 
कशी घ्याल काळजी
* पिण्याचे पाणी गाळून व दहा मिनिटे उकळून प्यावे.
* पिण्याचे पाणी झाकून ठेवावे व पाणी घेण्यासाठी ओगराळ्याचा किंवा लांब दांड्याच्या भांड्याचा वापर करावा.
* जेवणापूर्वी व बाळास भरविण्यापूर्वी हात साबणाने, राखेने स्वच्छ धुवावेत.
* पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गोळ्या किंवा द्रावण वापरावे.
* शौचावरुन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
* जुलाब झाल्यास ओ.आर.एस. पाकीटे शासकीय, निमशासकीय दवाखान्यातून मोफत घ्यावीत, तसेच घरात उपलब्ध असलेल्या द्रव पदार्थ उदा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी किंवा भाताची पेज इत्यादी भरपूर प्रमाणात घ्यावेत.
 
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे टाळा
* उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळ खाऊ नयेत.
* उघड्यावर व माशा बसलेले अन्न खाऊ नयेत.
* शिळे अन्नपदार्थ खाऊ नये.
* उघड्यावर शौचास बसू नये.
* अस्वच्छ व असुरक्षित पाणी पिऊ नये.
* आवश्यकता नसताना साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे.
* पायाला जखम असल्यास साठलेल्या पाण्यातून चालत जाऊ नये.
* साचलेल्या पाण्यातून चालणे टाळता येणे शक्य नसल्यास चालताना अनवाणी न चालता गमबुटांचा वापर करावा.
* ताप आल्यास दुर्लक्ष करु नये व त्वरीत दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* उंदरांचा प्रादुर्भाव कमी करावा.

First Published: Thursday, July 19, 2012, 10:43


comments powered by Disqus