सरकारवर नाराज शरद पवार, दिला राजीनामा - Marathi News 24taas.com

सरकारवर नाराज शरद पवार, दिला राजीनामा

www.24taas.com, नवी दिल्ली
 
पंतप्रधान ड़ॉ.  मनमोहन सिंग केंद्र  मंत्रिमंडळात ज्येष्ठतेनुसार दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार अपसेट झालेत. त्यांनी आपल्या नाजीतून पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी, अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही राजीनामा दिल्याने केंद्रातील सरकारची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादीने पंतप्रधानांना दणका दिल्याचे दिसून येत आहे.
 
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवून नाराजी व्यक्त केली होती. सतत होत असलेल्या मानभंगामुळे संतप्त झालेले पवार तसेच पटेल यांनी मंत्रीपदाचे राजीनामे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे पाठवून दिल्याचे वृत्त होते. यावर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन इन्कार केला होता. मात्र, आज सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवार आणि पटेल यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले.
 
यूपीए सरकारमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होताच गंभीर पेचप्रसंग उद्भवला आहे.मित्रपक्षांच्या नेत्यांना उचित सन्मान देणाऱ्या काँग्रेसला आघाडीचा धर्म पाळता येत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून करण्यात येत आहे. प्रणब मुखर्जी यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री कोण यावरून वाद उफाळला आहे. प्रणब मुखर्जीच्या राजीनाम्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शरद पवार यांना मनमोहन सिंग यांनी दुसऱ्या क्रमांकाची खुर्ची दिली होती. पण त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मान संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांना देण्यात आला. परिणामी दुखावलेल्या पवार यांनी उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी झालेल्या काँग्रेस-यूपीएच्या बैठकीवरच बहिष्कार घातला होता.
 
पवार यांना गुरुवारीही अँटनींपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकाची खुर्ची मिळणार अशी चर्चा दिवसभर सुरू होती. त्यामुळेच ही बैठक होण्याआधी पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली आणि दोघांनीही या बैठकीवर बहिष्कार घातला. त्यानंतर कालरात्रीपासून दिल्लीतील राजकीय नाट्यला सुरूवात झाली. आज सकाळी दहाजनपथवर जाऊन पवारांनी सोनिया गांधीची भेट घेतली. याभेटीनंतर पवारांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
 
पवारांच्या नाराजीचे नेमके कारण काय?
कॅबिनेटच्या बैठकीला अँटनी आले नव्हते. त्यामुळे शरद पवार यांना पंतप्रधानांनी दुसऱ्या क्रमांकाच्या खुर्चीवर बसविले. पण पुढच्याच बैठकीला अँटनी हजर झाल्याने पवार यांना पुन्हा तिसऱ्या क्रमांकाच्या खुर्चीवर बसावे लागले. त्यामुळे पवार नाराज असावे. त्यांचा मानभंग झाल्याची त्यांची भावना झाली असावी, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे.  दरम्यान, घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शरद पवार यांना दुसऱ्या क्रमांकाचा मान अधिकृतपणे देण्यात आला नव्हता, अशी माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या एका मंत्र्याने दिली.

First Published: Friday, July 20, 2012, 09:52


comments powered by Disqus