पवारांची नाराजी महाराष्ट्राच्या पथ्यावर? - Marathi News 24taas.com

पवारांची नाराजी महाराष्ट्राच्या पथ्यावर?

www.24taas.com, नवी दिल्ली
 
शरद पवारांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून  महाराष्ट्राला विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे.  राज्यातले दुष्काळग्रस्त आणि सिंचन प्रकल्पाच्या मदतीसाठी केंद्र सरकार साडे तीन हजार कोटींची मदत करणार असल्याचं समजतंय.
 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीनं काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याच्या बदल्यात केंद्र सरकारनं उत्तर प्रदेशला ४५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही रणनिती असल्याची चर्चा आहे. पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला यंदा दुष्काळाचे चांगलेच चटके बसले आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्राला मदत मिळावी अशी मागणी यापूर्वीच पवार यांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली होती. राज्यपालांच्या आदेशामुळे निधीवाटपात पश्चिम महाराष्ट्र आणि कृष्णा खोऱ्यातील पाटबंधारे कामांवर परिणाम झालाय. या पार्श्वभूमीवर या कामांसाठी पॅकेज देऊन पवारांची नाराजी दूर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय.
 
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात मंगळवारी अर्धा तास चर्चा झाली. काल सायंकाळी सोनियांनी पंतप्रधानांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
 
.

First Published: Wednesday, July 25, 2012, 12:39


comments powered by Disqus