Last Updated: Thursday, July 26, 2012, 13:43
www.24taas.com, कोकराझारआसाममध्ये दंगलीचं सत्र पेटलंय. आत्तापर्यंत या दंगलीत ४१ जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. जवळजवळ दोन लाख लोक बेघर झालेत अनेक जण बेपत्ता आहेत, अनेक गावं आगीत भस्मसात झाली आहेत आणि हजारो जणांना आपलं घराला पारखं व्हावं लागलंय. सरकारनं दंगलग्रस्तांना दिलासा आणि आसरा देण्यासाठी जवळजवळ १२५ सरकारी शिबिरं स्थापित केलीत तर १००० जवानांची एक तुकडी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धडपडतेय.
बोडो आदिवासी आणि बांगलादेशी मुस्लिम विस्थापितांमधील तणावातून हा हिंसाचार उसळलाय. मंगळवारपासून या भागात संचारबंदी लागू करण्यात आलीय. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकाराला लष्कराला पाचारण करावं लागलंय. हिंसेमध्ये सहभागी असणाऱ्यांना ताब्यात घेण्याचे आदेश सरकारनं दिलेत.
कोकराझारमध्येही गंभीर परिस्थिती आहे. अनेक जण आपलं घर सोडून गेलेत. हिंसा उफाळलेल्या जिल्ह्यांत सरकारी कॅम्प्स लावले गेलेत. या हिंसाचारांचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही दिसून येतोय. गुवाहाटीला जाणाऱ्या रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्रानं दोन हजार सैनिकांना तैनात केलंय.
भारतीय जनता पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं केंद्र आणि राज्य सरकारला या हिंसाचाराला दोषी ठरवलंय तर मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी दंगलीमागे राजकीय कटाची शक्यता वर्तविली आहे. दंगलखोरांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे बघून हा सुनियोजित कट असल्याचं गोगोई यांनी म्हटलंय.
.
First Published: Thursday, July 26, 2012, 13:43