एन डी तिवारीच रोहित शेखरचे पिता! - Marathi News 24taas.com

एन डी तिवारीच रोहित शेखरचे पिता!

www.24taas.com, नवी दिल्ली
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी हेच रोहित शेखर यांचे पिता असल्‍याचे डीएनए टेस्टच्या निकालात सिद्ध झाले आहे. तिवारी यांच्‍या डीएनए चाचणीचा अहवाल आज उच्‍च न्‍यायालयाने जाहीर केला.
तिवारी यांनी यासंदर्भात वारंवार नकार दिला आहे. तसेच डीएनए चाचणीलाही विरोध केला होता. रक्ताचा नमुना देण्‍यासही त्‍यांनी प्रचंड विरोध केला होता. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या दणक्‍यानंतर त्‍यांना रक्ताचा नमुना द्यावा लागला. त्‍यानंतर डीएनए चाचणी करण्‍यात आली. न्‍यायालयाने हा अहवाल जाहीर करतानाच तिवारी हेच रोहित शेखर यांचे पिता असल्‍याचा निर्णय दिला.
 
८७ वर्षीय तिवारी यांनी डीएनए चाचणी करतानाही ‘वय जास्त झाल्यामुळे आपण रक्त देऊ शकत नाही’ अशी सबब पुढे केली होती. यावेळी न्यायालयानं त्यांना चांगलंच फटकारलं होतं. तसंच २५ हजार रुपयांचा दंडही भरण्याचे आदेश कोर्टानं तिवारींना दिले होते. आता त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय की, ‘हा खटला दिल्ली हायकोर्टाच्या अधिकारक्षेत्रात येतो की नाही याचाही निर्णय अजून कोर्टानं घेतलेला नाही. अशावेळी डीएनए अहवाल जाहीर करणं हा माझ्यावर अन्याय ठरेल. कोर्टाच्या अधिकारक्षेत्राचा निर्णय होईपर्यंत हा अहवाल जाहीर केला जाऊ नये.’ दिल्लीचा रहिवासी असणाऱ्या रोहित शेखरनं तिवारींच्या या याचिकेला विरोध केला होता.
 
तिवारी यांनी डीएनए चाचणीचा अहवाल सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात येऊ नये, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. ती न्‍यायालयाने फेटाळून लावली. याप्रकरणाचा निकाल तिवारी यांच्‍याविरोधात गेल्‍यामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे. तिवारी हे काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते होते. उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री म्‍हणून त्‍यांनी दोन वेळा पद भूषविले होते. केंद्रात परराष्‍ट्रमंत्री म्‍हणूनही त्‍यांनी काम पाहिले होते. 2007 मध्‍ये ते आंध्र प्रदेशचे राज्‍यपाल म्‍हणून नियुक्त करण्‍यात आले होते. आंध्रात असताना ते वादाच्‍या भोव-यात अडकले होते.
 
 

First Published: Friday, July 27, 2012, 18:18


comments powered by Disqus