शार्क माशाचे अडीच हजार दात जप्त - Marathi News 24taas.com

शार्क माशाचे अडीच हजार दात जप्त

www.24taas.com, नवी दिल्ली 
नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून शार्क माशाचे तब्बल २४४५ दात जप्त केलेत.
 
सीमा शुल्क अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आदित्य सुरेंद्र गुप्ता या प्रवाशाला विमानतळाच्या ग्रीन चॅनलवरच गाठण्यात आलं. यावेळी त्याच्याकडे शार्कच्या दातांचा साठाच अधिकाऱ्यांना मिळाला. १९७२  च्या वन्य जीव संरक्षण कलमांतर्गत हा गुन्हा ठरतो. यानंतर अधिकाऱ्यांनी या शार्कच्या दातांना जप्त केलं. तसंच त्यांचे काही सम्पल्स इतर वन्य जीव अपराध नियंत्रण ब्युरोमध्ये पाठवण्यात आलेत. 'जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडया'कडेही या शार्कच्या दातांचे सॅम्पल्स पाठवण्यात आलेत.
 
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या दातांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तीन ते पाच लाखांपर्यंत आहे. या दातांचा उपयोग आभूषणांमध्ये केला जातो. आदित्य सुरेंद्र गुप्ता याची चौकशी सुरू आहे पण अजून त्याला अटक मात्र झालेली नाही.
 
.

First Published: Sunday, July 29, 2012, 15:25


comments powered by Disqus