Last Updated: Monday, July 30, 2012, 21:54
www.24taas.com, नवी दिल्ली उत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत होत असून झाल्या प्रकाराची तीन सदस्यीय समिती चौकशी करेल, अशी माहिती ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीये. वीजपुरवठा केंद्रातला बिघाड, जास्त फ्रिक्वेन्सी आणि कोट्यापेक्षा जास्त वीज घेतल्यामुळं नऊ राज्यांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.
गेल्या १० वर्षात प्रथमच ग्रीडमध्ये बिघाड झालाय. त्याचा फटका दिल्लीसह उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांना बसला. दिल्लीत ४० टक्के वीजपुरवठा सुरळीत झालाय. ऐन मध्यरात्री नॉर्थ ग्रीडमध्ये बिघाड झाल्यानं दिल्लीसह उत्तरेतल्या तब्बल नऊ राज्यांची बत्ती गूल झाली होती. याचा सर्वात मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसलाय. तब्बल ५०टक्के लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर परिणाम झालाय. दिल्लीतल्या मेट्रोसह ३०० लांबपल्ल्ल्याच्या रेल्वे गाड्या खोळंबल्या. बंद पडलेल्या नॉर्थ ग्रीडच्या दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
उत्तर भारतातील विद्युत ग्रिडमध्ये निर्माण झालेला दोष दूर करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न चालू असून, त्याला काही प्रमाणात यश आले आहे. दिल्लीसह नऊ राज्यांमधील काही भागांचा वीजपुरवठा सुरळीत होऊ लागला आहे. राजधानी दिल्लीतील मेट्रो सेवा पूर्ववत झाली आहे. भूतानमधून वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर, परिस्थितीत सुधारणा झाली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
उत्तर ग्रिडमधील तांत्रिक दोषामुळे रविवार रात्रीपासूनच या राज्यांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. या ग्रिडमध्ये अधिक फ्रीक्वेन्सी क्षमतेने वीज खेचण्यात आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. दहा वर्षांनंतर असा प्रकार घडल्याचे, केंद्रीय वीजमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
First Published: Monday, July 30, 2012, 21:54