Last Updated: Sunday, December 18, 2011, 04:31
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
केंद्रीय कॅबिनेटने रविवारी लोकपाल आणि खाद्य सुरक्षा विधेयक यांच्यावर चर्चा होणार आहे. हे दोन्ही विधेयक संसदेत पुढील आठवड्याता सादर करण्यात येणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार कॅबिनेटची बैठक सोमवारी होणारी होती पण आता ती आज (रविवारी) संध्याकाळी होणार आहे.
लोकपाल विधेयक संसदेच्या याच हिवाळी अधिवेशनात येईल असं पंतप्रधानांनी जाहीर केलं आहे. उद्या कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तर दुसरीकडं पंतप्रधानांना पत्र पाठवत अण्णांनी लोकपालवरून दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. लोकपाल विधेयकावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले असताना पंतप्रधानांनी याच अधिवेशनात लोकपाल मांडलं जाईल हे स्पष्ट केलं. त्याबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं मनमोहन सिंग रशियाच्या दौऱ्याहुन आल्यावर सांगितलं. अण्णांनी सरकारला उपोषणाचा इशारा दिला असतानाही सरकारनं लोकपाल याच अधिवेशनात आणण्याचे जाहीर करून शह देण्याचा प्रयत्न चालवला आहे.
अण्णा हजारेंनी पंतपधानांना चार पानी पत्र पाठवलं. त्यामध्ये सात प्रमुख मागण्या करण्यात आल्या. संसदेच्या याच अधिवेशनात लोकपाल विधेयक संमत केलं नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. लोकपाल विधेयक संसदेत सादर होईल तेव्हा अण्णा चर्चा ऐकण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित राहणार आहेत. २७ डिसेंबरपासून उपोषण आणि ३० डिसेंबरपासून जेलभरो आंदोलन कऱण्याचा इशारा अण्णांनी यापुर्वीच दिला आहे. लोकपालच्या मुद्द्यावर सहमती घडवडण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. सीबीआयचा मुद्दा वगळता इतर बाबींवर बऱ्यापैकी सहमती झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं आता याच अधिवेशनात लोकपाल येणार काय याची उत्सुकता आहे
First Published: Sunday, December 18, 2011, 04:31