प्रियंका गांधी जनतेच्या दरबारात - Marathi News 24taas.com

प्रियंका गांधी जनतेच्या दरबारात

www.24taas.com, नवी दिल्ली
 
प्रियांका गांधींवर आता नवी जबाबदारी येणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत रायबरेली मतदार संघाची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्यावर राहील. याखेरीज नवी दिल्लीत प्रियांका जनता दरबार घेतील असं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं.
 
गेल्यावर्षी उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी काँग्रेसचा प्रचार केला होता.२००९ मध्ये रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघात प्रचार केला होता. काँग्रेसचे खासदार व महासचिव राहुल गांधी यांचा पक्षात व सरकारमध्ये कोणती भूमिका घ्यावी याचा निर्णय झाला नसला तरी, त्यांची बहिण प्रियंका गांधी हिने राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत.
 
शनिवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात प्रियंका गांधी आता दर बुधवारी रायबरेली लोकसभा मतदारसंघातील लोकांशी संवाद साधतील. आपली आई सोनिया गांधी रायबरेलीतून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत, त्या लोकांसाठी प्रियंका खास जनता दरबार भरविणार आहे. त्यामुळे त्या राजकारणात सक्रीय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
प्रियंका गांधी यांनी याआधीही रायबरेली व अमेठी भागात प्रचारदौरे केले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघात जबरदस्त प्रचार केला होता.

First Published: Saturday, August 4, 2012, 21:02


comments powered by Disqus