अन्न सुरक्षा विधेयकाला मंजूरी - Marathi News 24taas.com

अन्न सुरक्षा विधेयकाला मंजूरी


झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
रोजगार हमीनंतर आता गरीबांना अन्न सुरक्षेची हमी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  देशातल्या ६७ टक्के लोकांना म्हणजचे ८० कोटी जनतेला दोनवेळच्या जेवणाची खात्री देणारे अन्न सुरक्षा विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं आहे.
 
उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांत होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळानं अन्न सुरक्षा विधेयकावर शिक्कामोर्तब केलं आहे. आज संसदेत हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. संसदेन हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ग्रामीण भागातील ७५ टक्के तर शहरी भागातील ५० टक्के लोकांना स्वस्त दरात धान्य मिळणार आहे.
 
त्यामुळे आज अन्न सुरक्षेची हमी मिळणारं विधयक संसदेत चर्चेला आल्यास ते मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे किमान दोन वेळच्या खाण्याची भ्रांत मिटेल अशी अपेक्षा आता सामान्यांकडून करण्यात येत आहे. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटूंबातील प्रतिव्यक्ती सात किलो धान्य स्वस्त दरात देण्यात येईल. त्यानुसार तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ, दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू, तर एक रुपया प्रतिकिलो दराने भरड धान्य (ज्वारी, बाजरी, मका) या कुटुंबाना मिळू शकेल. या कायद्याच्या अमलबजावणीसाठी अन्नधान्याला अतिरिक्त २७ हजार ६६३ कोटींची सबसिडी मंजूर करण्यात आली आहे.

First Published: Thursday, December 22, 2011, 19:47


comments powered by Disqus