शरद पवारांच्या हल्लेखोरास जामीन मंजूर - Marathi News 24taas.com

शरद पवारांच्या हल्लेखोरास जामीन मंजूर

 झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
शरद पवारांवर हल्ला चढविणाऱ्या अरविंदर सिंगला दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अरविंदर सिंगने मागच्या महिन्यात एका कार्यक्रमात शरद पवारांवर हल्ला केला होता. जिल्हा न्यायाधीश एच.एस.शर्मा यांनी सिंगला जामीन मंजूर करताना भविष्यात कोणतीही हिंसक कृती न करण्याची ताकीद दिली. सिंगला १०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. सिंगने घटना घडल्याच्या काही मिनीटे अगोदर आपलं मानसिक संतूलन हरवल्याचं आणि भान राहिलं नसल्याचं कारण जामीनासाठी विनंती करताना दिलं.
 
सिंग याच्या वकिलांनी आपल्या अशिलाला राजकीय दबावापोटी अडकवण्यात आल्याचा बचाव जामीनासाठी केला. सिंगने पार्लिमेंट स्ट्रीटवर असलेल्या ऑडिटोरियमच्या बाहेर पवारांवर हल्ला चढवला होता. त्याआधी सिंगने माजी दूरसंचार मंत्री सूखराम यांच्यावर देखील हल्ला चढवला होता. भ्रष्टाचार आणि दर वाढ यांच्या निषेधार्थ आपण पवारांवर हल्ला चढवल्याचं सिंगने सांगितलं होतं.

First Published: Thursday, December 22, 2011, 19:44


comments powered by Disqus