कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बंगाराप्पा यांचे निधन - Marathi News 24taas.com

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बंगाराप्पा यांचे निधन

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सारेकोप्पा बंगाराप्पा यांचे आज  पहाटे एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते.  बंगाराप्पांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि तीन मुली आहेत.  बंगाराप्पा किडनी आणि मधुमेहाच्या व्याधीने आजारी होते,  त्यांच्यावर ७ डिसेंबर पासून उपचार सुरु होते. बंगाराप्पांनी  नुकताच माजी पंतप्रधान एच.डी.डेवेगौडा यांच्या जनता दल  सेक्युलर पक्षात प्रवेश घेतला होता. बंगाराप्पांचा जन्म २६  ऑक्टोबर १९३२ रोजी झाला आणि त्यांनी १९६७ मध्ये राजकारणात प्रवेश केला. बंगाराप्पा १९६७ साली कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले आणि १९७२ साली देवराज अर्स मंत्रिमंडळात ते मंत्री होते. समाजवादाची दिक्षा घेतलेल्या बंगाराप्पांनी अनेक पक्षात भ्रमंती केली, अनेक वेळा काँग्रेस प्रवेश आणि पक्षाला सोडचिठ्ठी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. याव्यतिरिक्त स्वत:चा राजकीय पक्षही त्यांनी स्थापन केला, मधल्या काळात ते समाजवादी आणि भाजपाच्या छायेतही विसावले.
बंगाराप्पांनी कर्नाटकातल्या पहिल्या बिगर काँग्रेसी सरकारच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली होती. बंगाराप्पांच्या कर्नाटक क्रांती रंगाने रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिला होता.
बंगाराप्पा १९९० ते १९९२ या काळात कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी होते आणि या पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांनी कर्नाटक काँग्रेस पक्ष काढला आणि १९९४ सालची विधानसभा निवडणुक लढवली. त्यांच्या पक्षाने दहा जागा जिंकल्या. बंगाराप्पांनी राज्याच्या राजकारणात स्वत:चा ठसा उमटवला आणि ते लोकसभेवर १९९६, १९९९ आणि २००३ साली निवडून गेले. बंगाराप्पांच्या राजकीय जीवनात २००९ साल अत्यंत वाईट गेलं, त्या वर्षी बी.एस.येडियुरप्पा यांच्या मुलाने त्यांचा शिमोगा लोकसभा मतदारसंघात पराभव केला आणि त्या पाठोपाठ येडियुरप्पा यांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत केलं. बंगाराप्पांनी भाजपात तीन वर्षे काढली आणि याच पक्षाच्या तिकिटावर त्यांनी १९९६ आणि १९९९ साली लोकसभा गाठली.

First Published: Monday, December 26, 2011, 15:49


comments powered by Disqus