राम जेठमलानी यांचा सनसनाटी आरोप - Marathi News 24taas.com

राम जेठमलानी यांचा सनसनाटी आरोप

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
स्वीस बँकेत भारताच्या एका माजी पंतप्रधानांचा काळा पैसा आहे, असा सनसनाटी आरोप गुरूवारी राज्यसभेत ज्येष्ठ कायदा पंडित आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी  केला.
 
 
जेठमलानी यांच्या या विधानाने राज्यसभेतील लोकपाल विधेयकावरील चर्चेचा रोखच त्यांनी बदलून टाकला. प्रचंड गदारोळानंतर जेठमलानी यांचे शब्द कामकाजातून काढून टाकण्यात आले.
 
 
लोकपाल विधेयकाच्या संमतीसाठी राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात लठ्ठालठ्ठी सुरू असतानाच राम जेठमलानी यांनी १९९१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या युरोपियन मासिकात प्रसिध्द झालेल्या लेखाची प्रत झळकवत  काळ्या पैशाबाबत  सनसनाटी आरोप केला.
 
 
या लेखात काळा पैसा जमविल्यांची  नावे, छायाचित्रे आणि खाते क्रमांक उपलब्ध आहेत, असे वक्तव्य जेठमलानी यांनी केले. जेठमलानी यांच्या या वक्तव्यामुळे राज्यसभेतील लोकपाल विधेयकाच्या चर्चेचा रोखच बदलला.  जेठमलानी यांच्या आरोपांमुळे सत्ताधारी काँग्रेसच्या बाकावरील सदस्यांचा पाराच चढला. प्रचंड गदारोळ झाला.
 
काँग्रेस खासदारांनी भाजपवर आरोपबाजी सुरू केली. आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळात उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष के. रहमान खान यांनी सदस्यांना शांत राहण्याचे वारंवार आवाहन केले. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

First Published: Friday, December 30, 2011, 10:38


comments powered by Disqus