उ. प्रदेशमध्ये राजकीय वारसदारांचे भवितव्य पणाला - Marathi News 24taas.com

उ. प्रदेशमध्ये राजकीय वारसदारांचे भवितव्य पणाला

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभेच्या निवडणुका अनेक राजकीय घराण्यांच्या वारसदारांसाठी सत्वपरिक्षा घेणारा ठरेल. काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी आणि त्यांचे चुलत भाऊ भाजपाचे वरुण गांधी यांच्यासाठी ही कठिण परिक्षा असेल. या व्यतिरिक्त समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यादव यांचे चिरंजीव अखिलेख यादव तसंच अजित सिंग यांचे चिरंजीव जयंत चौधरी यांचीही कसोटी लागणार आहे.
 
राहुल गांधींसाठी बिहारमधल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या दारुण पराभवावंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुका प्रतिष्ठेची आहे. मुलायम सिंग यादव यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांनाही विजयश्री खेचून आणणं त्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये घमासान होण्याची चिन्हं आहेत. भाजपाने अजुन आपले पत्ते उघड केले नसले तरी तरुण मतदारांना साद घालण्यासाठी वरुण गांधींना मैदानात उतरवलं जाईल.
 
अजित सिंगांच्या राष्ट्रीय लोक दलाने जरी काँग्रेससोबत आघाडी केली असली तरी जयंत चौधरी यांना पश्चिम उत्तर प्रदेशात पक्षाचे संख्याबळ वाढवण्याचे आव्हान पेलावं लागणार आहे. निवडणुक आयोगाच्या रेकॉर्डनुसार उत्तर प्रदेशातील १२ कोटी मतदारांपैकी २५ टक्के म्हणजेच चार कोटी मतदारांपेक्षा जास्त हे १८ ते ३० वयोगटातील आहेत. यापैकी १८ वर्षांचे ५३ लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
 
काँग्रेस गेली २२ वर्षे उत्तर प्रदेशात सत्तेच्या बाहेर आहे आणि राहुल गांधी गेली अनेक वर्षे पक्षाची उभारणी करण्यासाठी मेहनत घेत आहे. अखिलेख यादव यांच्यासाठीही अस्तित्वाची लढाई आहे कारण आता ते समाजवादी पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांनी निवडणुकीच्या खुप आधी मतदारां पर्यंत पोहचण्यासाठी क्रांती रथ यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले आहेत. या रथ यात्रेचा प्रारंभ सप्टेंबर महिन्यात झाला आणि आता पर्यंत आठ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. अखिलेश यादव येत्या काही दिवसात सक्रिय होतील. तसंच उमेदवार निवडीबाबत त्यांनी अतिशय सावधानता बाळगली आहे आणि त्यामुळेच पहिली यादी जाहीर झाल्यानंतर काही मतदारसंघातील उमेदवारही बदलण्यात आले आहेत.
 
 

First Published: Sunday, January 1, 2012, 18:28


comments powered by Disqus