Last Updated: Thursday, January 26, 2012, 09:03
www.24taas.com, नवी दिल्ली भारतीय संसदेने सामान्य लोकांच्या प्रगती आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण कायदे केले आहेत. सरकारनेही अनेक योजना आणल्या आहेत. मात्र, लोकशाही व्यवस्था कोसळणार नाही याची काळजी कोणतीही सुधारणा करताना घेतली पाहिजे, असे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सांगितले. ६३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून त्या बोलत होत्या.
आपल्या न्यायव्यवस्थेला सन्मान आहे. माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर्व संस्थांनी समान राष्ट्रीय उद्दिष्टासाठी संघटित कार्य केल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होईल, असे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या भ्रष्ट्राचारविरोधी चळवळीचा संदर्भ राष्ट्रपतींच्या विधानामागे आहे. मात्र, त्यांनी भाषणात कोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, एखादे खराब फळ काढण्यासाठी झाड हलवावे लागते. मात्र, ते कोसळणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी. हेच लोकशाही व्यवस्थेबाबत आहे. व्यवस्थेतील सुधारणांसाठी अशीच काळजी घ्यावी लागेल, असे पाटील यांनी सांगितले.
भारताला लोकशाही व्यवस्थेचा अभिमान वाटला पाहिजे. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेसमोर जो दबाव आणि आव्हाने निर्माण होतात, तशीच ती भारतीय व्यवस्थेसमोर आहेत. लोकशाहीवर विश्वास असणाऱ्यांनी आपल्या मुद्द्यांचा दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनही विचार केला पाहिजे. चर्चेतून प्रश्न सोडविले पाहिजेत; हिंसाचाराने नव्हे. नकारात्मकता आणि नाकारणे हा मार्ग भारतासारख्या तेजस्वी देशाचा नाही, राष्ट्रपती पाटील म्हणाल्या.
First Published: Thursday, January 26, 2012, 09:03