निवडणूक लढवण्यास सफाई कामगार उत्सुक - Marathi News 24taas.com

निवडणूक लढवण्यास सफाई कामगार उत्सुक

हेमंत बिर्जे, www.24taas.com, मुंबई
 
निवडणूक... मग ती महापालिकेची असो, विधानसभेची असो किंवा लोकसभेची असो निवडणूक म्हणजे प्रस्थापितांचा, पैसेवाल्यांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. मुंबईत मात्र एक सफाई कामगार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
 
मुंबईच्या रस्त्यावर हातात झाडू घेऊन साफसफाईचं काम करणाऱ्या राणीबाई खैरे आता महापालिकेच्या आखाड्यात उतरण्यास इच्छुक आहेत.  कुलाबा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या  वॉर्ड क्रमांक २२६ मधून  त्यांनी कॉग्रेस पक्षाकडं उमेदवारी मागितली आहे. गेली तीस वर्षं काँग्रेस पक्षाच्या सक्रिय सदस्या म्हणून राणीबाई  काम करत आहेत. तसंच त्या कुलाबा महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा आहेत. स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षासाठी केलेल्या कामामुळे उमेदवारीसाठी दावा करत असल्याचं त्या सांगतात.
 
कॉग्रेसचे प्रेरणास्थान महात्मा गांधींनी काँग्रेस पक्षाचं काम करताना हातात झाडू घेतला होता. त्यामुळे सफाई कामगाराला काँग्रेसनं उमेदवारी दयावी अशी मागणी राणीबाई खैरे करत आहेत. पक्षाकडून  आता कसा प्रतिसाद मिळतो याकडं पहावं लागेल.
 

First Published: Saturday, January 28, 2012, 22:53


comments powered by Disqus