दूध प्या, स्मरणशक्ती वाढवा - Marathi News 24taas.com

दूध प्या, स्मरणशक्ती वाढवा

www.24taas.com, बंगळूर
 
अनेकांना दूध पिण्यास आवडत नाही. मात्र, ही सवय मोडायला हवी, कारण दुधाचे अनेक फायदे आहेत. नियमित दूध पिणे हे मेंदूच्या स्वास्थासाठी चांगले असतेच, पण त्याबरोबरच हृदयाच्या वाहिन्या, अन्य जीवनशैली आणि आहारावरही त्यांचा चांगला परिणाम होतो.
 
नियमित दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाणाऱ्यांची स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यप्रणाली दूध न पिणाऱ्यांपेक्षा अधिक सक्षम असल्याचे एका संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे.
 
बंगळूर येथील एका विद्यापीठाने हे संशोधन केले आहे. या संशोधनासाठी नऊशे स्त्री-पुरुषांची निवड करण्यात आली होती. २३  ते ९८  वयोगटातील या नऊशे जणांची मेंदूची चाचणी करण्यात आली. त्यात दृश्‍यपटल, मौखिक आणि स्मृती चाचणीचा समावेश होता. त्याचवेळी त्यांच्या दूध पिण्याच्या सवयींवरही लक्ष ठेवण्यात आले होते. या संशोधनाअंतर्गत घेतलेल्या चाचणीत दूध न पिणारे तुलनेने पाच पट अयशस्वी ठरले आहेत.
 
आठही स्तरांवरील चाचण्यात दूध पिणाऱ्यांनी अनियमित दूध पिणाऱ्यांपेक्षा चांगले गुण मिळविले आहेत. किंबहुना, दूध निरोगी आरोग्यासाठी लाभदायी आहे, असे या संशोधनातून समोर आले. जी व्यक्ती दिवसातून किमान एक ग्लास दूध पिते तिला त्याचा लाभ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेंदूशी संबंधित आठ स्तरांवरील कार्यप्रणाली अधिक चांगली असल्याचेही यातून दिसून आले आहे.
 

First Published: Wednesday, February 1, 2012, 12:42


comments powered by Disqus