'टीम अण्णा' : फूट की एकजूट? - Marathi News 24taas.com

'टीम अण्णा' : फूट की एकजूट?

झी २४ तास वेब टीम, गाजियाबाद
 
टीम अण्णांची गाजियाबाद येथे मतभेदाच्या पार्श्वभूमीवर चिंतन बैठक सुरू झाली आहे, यामध्ये किरण बेदी, केजरीवाल, प्रशांत भूषण, शांतिभूषण, सिसोदीया यांची उपस्थिती आहे तर अण्णा हजारे आणि मेधा पाटकर हे अनुपस्थित आहेत.
 

प्रशांत भूषण यांना काश्मीरच्या मुद्यावरून झालेली मारहाण , किरण बेदींवर झालेले आरोप , अरविंद केजरीवालांवर झालेली चप्पलफेक या सर्व घटनांमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखालील नागरी समितीत बदल करण्याची मागणी पुढे आली असून आज , शनिवारी गाझियाबादनजीक होणाऱ्या समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे .
 
गेल्या काही दिवसांत ' टीम अण्णा ' तील प्रत्येक सदस्याला कोणत्या ना कारणाने जनक्षोभाला सामोरे जावे लागले आहे . तसेच मॅगसेसे विजेते जलतज्ज्ञ राजिंदर सिंह व पी . व्ही . राजगोपाल यांनी राजीनामा दिला आहे . त्यामुळे नागरी समितीत बदल करावेत , अशी मागणी अण्णांचे सहकारी कुमार विश्वास यांनी पत्राद्वारे केली आहे . या पार्श्वभूमीवर आज , शनिवारी गाझियाबादजवळ नागरी समितीची बैठक होत आहे. सध्या मौनव्रतात असलेले अण्णा या बैठकीला उपस्थित असणार नाहीत . त्यातच संतोष हेगडे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे कळवले आहे .
 
मौनव्रतात असलेल्या अण्णांनी ब्लॉगवर टीमचा विस्तार करण्याचे संकेत दिले . मात्र , हे बदल कधी होतील याचा तपशील ब्लॉगमध्ये नाही . निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी टीम अण्णा अराजकीय संघटना स्थापन करणार असल्याचेही ब्लॉगमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे .
 

First Published: Saturday, October 29, 2011, 08:05


comments powered by Disqus