Last Updated: Thursday, November 3, 2011, 10:35
झी २४ तास वेब टीम, दिल्ली 
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात आरोपी असलेल्या द्रमुक खासदार कनिमोळींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. कनिमोळींसह अन्य सात आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र या सर्व आठही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला होणार आहे. दिल्लीच्या पटियाळा कोर्टात ही सुनावणी झाली. कनिमोळींनी अनेकदा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र जामीन मिळाला नव्हता.
आज जामीन मिळण्याची शक्यता असल्यानं कनिमोळींची आई आणि द्रमुक अध्यक्ष करुणानिधींची पत्नी कोर्टात हजर होती. मात्र जामीन फेटाळल्यानंतर कनिमोळीं आणि त्यांच्या आईला अश्रू आवरणं अशक्य झालं. कनिमोळी ह्या महिला असल्या तरी त्यांना कोणत्याही भेदभावाला सामोरं जावं लागत नसून त्यांच्यावर असलेले आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. कनिमोळी यांच्यासह स्वान टेलिकॉमचे शाहीद बलवा, माजी दूरसंचारमंत्री मंत्री ए. राजांचे खासगी सचिव आर. के. चंडोलिया, कलैगनार टीव्हीचे शरद कुमार, आसिफ बलवा, राजीव अग्रवाल आणि निर्माता करीम मोरानी यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.
First Published: Thursday, November 3, 2011, 10:35