अण्णा ब्लॉगमधून 'साइन आऊट' - Marathi News 24taas.com

अण्णा ब्लॉगमधून 'साइन आऊट'

झी २४ तास वेब टीम, दिल्ली
 
जनलोकपाल आंदोलनाचे सर्वेसर्वा अण्णा हजारे यांनी त्यांचा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अण्णा हजारेंचे ब्लॉगर राजू परुळेकर यांनी अण्णा हजारेंच्या ब्लॉगवरून टीम अण्णांवर टीका केल्यानंतर अण्णा हजारेंनी त्यांचा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय घेतला. ब्लॉगच्या माध्यमातून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप अण्णांनी केला. टीम अण्णांच्या बदनामीसाठी करोडो रुपयांचा खर्च होतो, असंही अण्णांनी सांगितलं. अण्णांच्या ब्लॉगवर अण्णांचं जे लिखित पत्र प्रसिद्ध झालं आहे त्यात कोअर कमिटीत बदल करण्याचा अण्णांचा विचार होता, असा गौप्यस्फोट अण्णांचे ब्लॉगर राजू परुळेकर यांनी केला.
 
अण्णांनी शुक्रवारी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत राजू परुळेकरांवर अविश्वास दाखवला होता. राजू परुळेकर यांनी स्वतःच्या मनाने काही लिहिले आहे का याची चौकशी करतो, असं अण्णांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं. त्यामुळं व्यथित झालेल्या परुळेकरांनी अण्णांचे 23 ऑक्टोबर 2011 चे पत्रच ब्लॉगवर प्रसिद्ध केल्यानं खळबळ उडाली. कोअर कमिटीत बदल करण्याबाबतचं अण्णांचं पत्र राजू परुळेकर यांनी ब्लॉगवर प्रसिद्ध केलं. तसंच अण्णा हजारे केजरीवाल, बेदी, भूषण पिता-पूत्र यांच्या हेकेखोरपणाला कंटाळले आहेत, असा दावा परुळेकर यांनी अण्णांवर केला.

First Published: Saturday, November 5, 2011, 11:59


comments powered by Disqus